राजकारण्यांचे पगार कमी करा, चार्टर्ड विमानांवर बंदी घाला; बागेश्वर बाबाचा मोठा सल्ला

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करत राजकारण्यांना मोठा सल्ला दिला आहे. त्यांनी नेत्यांचे पगार किमान तीन महिन्यांसाठी थांबवण्याची आणि चार्टर्ड विमानांच्या वापरास बंदी घालण्याची मागणी केली आहे.

राजकारण्यांचे पगार कमी करा, चार्टर्ड विमानांवर बंदी घाला; बागेश्वर बाबाचा मोठा सल्ला
bageshwar baba
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 28, 2026 | 11:14 PM

बागेश्वर धामचे प्रमुख पुजारी, पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, ते एका कथेदरम्यान देशाची आर्थिक परिस्थिती, इंधनाचा वापर आणि राजकारण्यांच्या खर्चावर स्पष्ट भाष्य करताना दिसत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये बागेश्वर बाबा थेट राजकारण्यांवर घसरताना दिसत आहेत. विमान सेवांबाबतही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

या कथेदरम्यान धीरेंद्र कृष्णशास्त्री म्हणाले की, जेव्हा जेव्हा पेट्रोल आणि डिझेल वाचवण्याची किंवा संसाधनांचे संवर्धन करण्याची चर्चा होते, तेव्हा सामान्य जनतेलाच त्याग करून बचत करण्याचे आवाहन केले जाते. चार्टड विमानांना सर्वाधिक इंधन लागते. मग राजकारण्यांकडून वापरल्या जाणाऱ्या चार्टर्ड विमानांवर बंदी घालण्याबद्दल चर्चा का होत नाही? असा सवाल बागेश्वर बाबांनी केला आहे.

तीन महिने पगार नकोच

देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आणि रुपयाचे घसरणारे मूल्य सांभाळण्यासाठी राजकारण्यांनीही जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळेच राजकारण्यांचे पगार किमान तीन महिन्यांसाठी थांबवले पाहिजेत किंवा कमी केले पाहिजेत. जेणेकरून समाजातील सर्व घटक राष्ट्रीय हितासाठी समान योगदान देत आहेत, असा संदेश जनतेला मिळेल, असा सल्लाही बागेश्वर बाबांनी दिला आहे.

सामान्यांवर भार नको

जेव्हा संकट येते किंवा बचतीची गरज असते, तेव्हा त्याचा भार केवळ सामान्य लोकांवर टाकू नये. त्यांनी नेते आणि जबाबदारीच्या पदांवरील व्यक्तींनी आदर्श घालून द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली, असं सांगतानाच भारतीय रुपया कमजोर होत आहे, त्याला मजबूत करा. आता सामान्य लोकांनी काय करावे? जाऊ द्या, आम्हाला काय करायचे आहे? असा सवाल त्यांनी केला. यावेळी कथा मंडपात उपस्थित असलेल्या भक्तांनी त्यांच्या वक्तव्याला टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक त्यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही जण याला सामान्य लोकांच्या भावनांशी संबंधित वक्तव्य म्हणत आहेत, तर काही जण याकडे व्यवस्थेवरील उपहास म्हणून पाहत आहेत. मात्र, सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us