उद्या भारत बंदची हाक, कोणत्या सेवांवर परिणाम होणार? वाचा…

उद्या (9 जुलै) 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. याचा मोठा परिणाम संपूर्ण देशावर होण्याची शक्यता आहे. या भारत बंदबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्या भारत बंदची हाक, कोणत्या सेवांवर परिणाम होणार? वाचा...
bharat bandh
| Updated on: Jul 08, 2025 | 6:01 PM

देशभरातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या (9 जुलै) 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. हे कर्मचारी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांविरोधात आंदोलन करणार आहेत. याचा मोठा परिणाम संपूर्ण देशावर होण्याची शक्यता आहे. या भारत बंदबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

9 जुलै रोजी 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये बँकिंग, विमा, टपाल, कोळसा खाणकाम, रस्तेवाहतूक, बांधकाम आणि राज्यातील वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य जनतेला त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

भारत बंदमध्ये कोण-कोणत्या संघटना सहभागी

उद्याच्या भारत बंदमध्ये AITUC, HMS, CITU, INTUC, INUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC या संघटना सहभागी होणार आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांच्या संयुक्त आघाडीनेही या संपाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातही या बंदचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. मात्र आरएसएसशी संलग्न असलेली भारतीय मजदूर संघ हा संघटना बंदमध्ये सहभागी होणार नाही.

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या नेत्या अमरजीत कौर म्हणाल्या की, ‘या बंदमध्ये 25 कोटींहून अधिक कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. देशभरातील शेतकरी आणि कामगार या बंदमध्ये सामील होणार आहेत. तसेच हिंद मजदूर सभेचे नेते हरभजन सिंग सिद्धू म्हणाले की, ‘या संपामुळे बँकिंग, टपाल, कोळसा खाण, कारखाने, राज्यांमधील वाहतूक सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.’

कर्मचाऱ्यांनी संप का पुकारला आहे ?

संप पुकारणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे की, आम्ही कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे 17 कलमी मागण्यांची सनद सादर केली होती, मात्र यावर अद्याप विचार झालेला नाही. सरकार गेल्या 10 वर्षांपासून वार्षिक कामगार परिषद आयोजित करत नाहिये, तसेच नवीन कामगार संहितेद्वारे कामगार संघटनांना कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे, कामाचे तास वाढवले ​​जात आहेत, तसेच कामगारांचे हक्क कमी केले जात आहेत त्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे.

दरम्यान, कामगार संघटनांनी यापूर्वी 26 नोव्हेंबर 2020, 28-29 मार्च 2022 आणि 16 फेब्रुवारी 2024 रोजी अशाच प्रकारचे देशव्यापी संप पुकारले होते. आता 2025 मध्येही असाच संप पुकारण्यात आला आहे.