
भाजप आणि मित्रपक्षांना बिहार विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. एनडीए आघाडी 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मादींनी या निकालावर भाष्य केले आहे. तेजस्वी यादव यांनी MY (मुस्लिम आणि यादव) फॉर्म्युल्यावर भर दिला होता. मात्र याला यश मिळालेले नाही. यानंतर आता पंतप्रधान मोदींनी MY फॉर्म्युल्याचा नवीन अर्थ सांगितला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हा मोठा विजय देत आणि अतूट विश्वास व्यक्त करत बिहारच्या लोकांनी धुरळाच उडवून दिला आहे. आम्ही तर जनता जनार्दनाचे सेवक आहोत. आम्ही आपल्या मेहनतीने जनतेचं हृदय खूश करत असतो. आम्ही तर जनता जनार्दनाचं हृदय चोरून बसलेलो आहोत. त्यामुळे संपूर्ण बिहारने दाखवून दिलंय की पुन्हा एकदा एनडीए सरकार. फिर एकबार एनडीए सरकार.
तेजस्वी यादव यांच्या MY फॉर्म्युल्यावर बोलताना म्हटले की, ‘एक म्हण आहे, लोहा लोहे को काटता है. बिहारमध्ये लांगूलचालन करणारा MY फॉर्म्युला केला होता. पण आजच्या विजयाने नवीन सकारात्मक एमवाय माय फॉर्म्युला दिला आहे. तो आहे महिला आणि युथ. आज बिहार देशाच्या ज्या राज्यांमध्ये आहे, जिथे सर्वाधिक तरुणांची संख्या आहे. त्यात प्रत्येक जात आणि धर्माचे लोक आहेत. त्यांची इच्छा आहे. त्यांची आकांक्षा आहे. त्यांच्या स्वप्नांनी जंगलराजवाल्यांच्या सांप्रदायिक माय फॉर्म्युल्याला उद्ध्वस्त केलं आहे.
मी बिहारच्या तरुणांचं अभिनंदन करतो. मी बिहारच्या माता भगिनींना नमन करतो. बिहारचे कष्टकरी, श्रमिक, पशूपालक, मच्छिमारांना नमन करतो. एनडीएच्या टीमला अभिनंदन करतो. नितीश कुमार यांनी चागंलं नेतृत्व दिलं. भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी सातत्याने मेहनत केली. चिराग पासवान, कुशवाह, जीतन राम मांझी यांनी चांगलं नेतृत्व दिलं. कार्यकर्त्यांनी बुथ लेव्हलला चांगला संवाद ठेवला. तुम्ही सर्वांनी एनडीएला मोठा विजय मिळवून दिला आहे.’
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मी जम्मू काश्मीरच्या नगरोटाच्या लोकांच्या ओडीसाच्या जनतेचेही आभार मानतो. त्यांनी पोटनिवडणुकीत भाजपचा विजय मिळवून दिला. आज केवळ एनडीएचा विजय झाला नाही तर लोकशाहीचा विजय झाला आहे. भारताच्या लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांचाही विजय आहे.’