‘हा तर 140 कोटी जनतेचा अपमान’, PM मोदींना गद्दार म्हणणार्या राहुल गांधींना भाजपने सुनावलं
Rahul Gandhi : रायबरेली येथे आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी आणि अमित शाह यांना गद्दार असे म्हटले होते. त्यानंतर आता भाजपने राहुल गांधींवर पलटवार केला आहे.

लोकसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. रायबरेली येथे आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी आणि अमित शाह यांना गद्दार असे म्हटले होते. त्यानंतर आता भाजपने राहुल गांधींच्या या विधानाचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मोदी-शाह यांचा गद्दार असा उल्लेख
राहुल गांधी यांनी सरायबरेली येथील सभेत बोलताना म्हटले होते की, ‘हा देश सर्वांचा आहे, तो कोणत्याही एका जातीचा किंवा संघटनेचा नाही. संविधान हे देशातील जनतेचा आवाज आहे आणि त्याचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. भाजपने देश विकण्याचे काम केले आहे.’ पुढे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले की, ‘जेव्हा भाजप आणि आरएसएसचे लोक तुमच्यासमोर येतील आणि नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्याबद्दल बोलतील, तेव्हा त्यांना स्पष्ट सांगा की नरेंद्र मोदी-अमित शाह गद्दार आहेत.’
देशावर आर्थिक संकट येण्याचा इशारा
राहुल गांधी यांनी पुढे बोलताना देशात मोठे आर्थिक संकट येण्याचा इशाराही दिला. गांधींना आरोप केला की, ‘पंतप्रधान मोदी जनतेला सोने खरेदी करू नका, परदेश प्रवास टाळा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा असे सांगतात, पण स्वतः मात्र हजारो कोटींच्या विमानातून परदेश दौरे करतात.’ पुढे गांधी यांनी महागाई वाढण्याचा, वस्तूंच्या किमती वाढण्याचा आणि खतांच्या टंचाईचा इशाराही दिला आहे.
भाजपकडून गांधींच्या विधानाचा समाचार
राहुल गांधी यांच्या टीकेनंतर भाजपने राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. भाजपने म्हटले की, राहुल गांधी यांनी केवळ पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा नाही, तर 140 कोटी भारतीयांचा अपमान केला आहे. भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांची मानसिकता अर्बन नक्षलवाद्यांसारखी सारखी असल्याचा आरोप करत ते पाकिस्तानची भाषा बोलत असल्याची टीकाही केली आहे.