मतदार याद्यांमध्ये खरच काही गडबड आहे का? राहुल गांधींच्या आरोपांमध्ये किती तथ्य? भाजपनं थेट व्हिडीओच शेअर केला
सध्या बिहारमध्ये एसआयआर वरून वातावरण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधींकडून आरोप केले जात आहेत, मात्र आता भाजपानं देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सध्या बिहारमध्ये एसआयआर वरून वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्याकडून या मुद्द्यावर भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ केल्याचा तसेच सामान्य लोकांच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्याकडून भाजपवर होत आहे. या दोन्ही नेत्यांकडून सध्या बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रेच आयोजन करण्यात आलं आहे.
याचदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनच्या माध्यमातून त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मैं अभी भी वहीं खड़ा हूं… जहां मेरा झूठ पकड़ा गया, सच सामने आया,और मैंने खुद को मूर्ख बनाया… मैं अभी भी वहीं खड़ा हूं’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
जे.पी. नड्डा यांनी ट्विटरवर त्याच महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे, जिने राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यासमोर आपल्या कुटुंबातील 6 लोकांचे नाव मतदार यादीमधून कट केल्याचा दावा केला होता, मात्र या व्हिडीओमधून सत्य समोर आलं आहे. या महिलेच्या कुटुंबातील एकाही सदस्याचं नाव मतदार यादीमधून कट करण्यात आलेलं नसल्याचं समोर आलं आहे.
मतदार अधिकार यात्रेदरम्यान रंजू देवी नावाच्या एका महिलेनं आपल्या कुटुंबातील सहा सदस्यांची नावं मतदार यादीतून कट झाल्याचा दावा राहुल गांधी यांच्याशी बोलताना केला होता. मात्र तपासामध्ये या महिलेची ही तक्रार खोटी निघाल्याचं समोर आलं आहे. तपासामध्ये असं समोर आलं आहे की, रंजू देवी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं या मतदार यादीमध्ये आहेत, कोणाचंही नाव मतदार यादीमधून वगळण्यात आलेलं नाहीये.
खड़ा हूँ आज भी वहीं… जहाँ मेरा झूठ पकड़ाया, सच सामने आया, और मैंने अपना मज़ाक बनवाया… खड़ा हूँ आज भी वहीं। https://t.co/Ihdl77pR97
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) August 19, 2025
वार्ड सचिवानं सांगितलं
रोहतास जिल्ह्यात राहणाऱ्या रंजू देवी यांनी आता असा दावा केला आहे की, मला आमच्या वार्ड सचिवांकडून सांगण्यात आलं होतं की, तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नाव मतदार यादीमध्ये नाहीयेत. त्यांनी मला असं देखील सांगितलं की राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे सध्या मतदार अधिकार यात्रेवर आहेत, त्यांच्याशी बोलून पुन्हा तुमची नाव मतदार यादीमध्ये जोडा, त्यामुळे मी राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली होती, असं या महिलेनं आता सांगितलं आहे. मात्र जेव्हा मी स्वत: मतदार यादी पाहिली तेव्हा त्या यादीमध्ये माझं आणि माझ्या कुटुंबाचं नाव होतं असंही यावेळी रंजू देवी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता राहुल गांधी यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका होत आहे, हा स्क्रिप्टेड पीआर होता असं एका युजरने राहुल गांधी यांना उद्देशून म्हटलं आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं देखील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
