कधीच विमानात बसणार नाही..; एअर इंडिया विमान दुर्घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाने घेतला आयुष्यभराचा धसका

याच व्हिडीओमध्ये एअर इंडियाचं ड्रीमलायनर 787-8 टेक-ऑफनंतर लगेचच कोसळताना आणि त्यानंतर मोठा स्फोट झाल्याचं दिसलं होतं. हाच व्हिडीओ आता तपासकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. ज्या मुलाने हा व्हिडीओ शूट केला, त्याची प्रतिक्रिया समोर आली आहे.

कधीच विमानात बसणार नाही..; एअर इंडिया विमान दुर्घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाने घेतला आयुष्यभराचा धसका
आर्यन नावाच्या मुलाने विमानाचा व्हिडीओ शूट केला होता.
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 15, 2025 | 10:15 AM

बारावीत शिकणारा आर्यन असारी दोन दिवसांपूर्वीच अहमदाबादच्या लक्ष्मीनगर परिसरात वडिलांना भेटायला आला होता. हा लक्ष्मीनगर परिसरा अहमदाबाद विमानतळाच्या जवळच होता. मूळचा आरवली जिल्ह्यात राहणाऱ्या आर्यनला विमानांचं खूप कुतूहल होतं. आपल्या गावातील मित्रांना विमान जवळून दाखवण्यासाठी त्याने इमारतीच्या टेरेसवरून व्हिडीओ शूट करायचं ठरवलं होतं. तीन मजली इमारतीच्या टेरेसवर उभ्या असलेल्या आर्यनच्या डोक्यावरूनच एअर इंडियाची ड्रीमलायनर 787-8 ही लंडनला जाणारी विमान गेली होती. आर्यनने शूट केलेल्या या व्हिडीओत विमानाच्या भीषण अपघाताचं दृश्य टिपलं गेलं होतं. या घटनेनंतर पोलिसांनी आर्यनचा जबाब नोंदवला आहे. 17 वर्षीय आर्यनने त्याच्या डोळ्यांदेखत विमान कोसळताना आणि त्याचा मोठा स्फोट होताना पाहिलंय. या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला असून त्याला रात्रीची झोपसुद्धा लागत नाहीये.

पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत आर्यन म्हणाला, “मी विमान टेक-ऑफ करताना होणारा जोरदार आवाज कधीच ऐकला नव्हता. इतक्या जवळून विमान उडताना मी कधीच पाहिलं नव्हतं. माझ्या वडिलांनी मला त्याबद्दल सांगितलं होतं. गावातील माझ्या मित्रांना विमान आकाशात उडताना कसं दिसतं, ते पहायचं होतं. मित्रांना दाखवण्यासाठी मी त्यादिवशी दुपारी विमानाचे काही व्हिडीओ शूट करण्याचं ठरवलं होतं. दुपारी जेवल्यानंतर मी टेरेसवर गेलो, पण मी विमान कोसळल्याचा व्हिडीओ शूट करेन असा स्वप्नातही विचार केला नव्हता.”

“टेक-ऑफनंतर ते विमान हळूहळू खालच्या दिशेने जात होतं. त्यामुळे लँडिंग होतंय की काय, असा मला प्रश्न पडला होता. परंतु जेव्हा त्या विमानाचा स्फोट झाला आणि मोठा आगीचा गोळा मी माझ्या डोळ्यांसमोर पाहिला, तेव्हा मी प्रचंड घाबरलो होतो”, अशा शब्दांत आर्यनने त्या घटनेचं वर्णन केलं. त्याने तो व्हिडीओ लगेचच वडिलांना पाठवला. आर्यनचे वडील निवृत्त सैन्य अधिकारी असून ते अहमदाबाद मेट्रोमध्ये सुपरवायजर म्हणून काम करतात.

आर्यन फक्त ती विमान दुर्घटना पाहूनच नाही तर सतत तपासकर्त्यांकडून येणाऱ्या फोन कॉल्समुळेही प्रचंड घाबरल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतल्याची माहिती अहमदाबादच्या क्राइम ब्रांचने दिली. त्याचसोबत पोलिसांनी हेसुद्धा स्पष्ट केलं की त्यांनी आर्यनला ताब्यात घेतलं नाही, तर फक्त त्याने जे पाहिलं त्याबद्दलची माहिती जाणून घेतली.

विमानातून एकदा तरी प्रवास करायचं आर्यनचं स्वप्न होतं. परंतु आता कधीच विमानात बसणार नाही, असं त्याने ठरवल्याचं कुटुंबीयांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर आता जेव्हा कधी त्यांच्या इमारतीवरून एखादं विमान जातंय, तेव्हा आर्यनला प्रचंड घबराट जाणवतेय. तो कोणाशी नीट बोलूही शकत नाहीये. आर्यनच्या वडिलांनी त्याला काही दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.