बी.टेकची पदवी, आयईडी स्फोटकं बनवण्यात एक्सपर्ट, कबड्डीपटू; कोण आहे एन्काऊंटरमध्ये मारला गेलेला नक्षलवादी बसवा राजू?
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षादलाचं मोठं ऑपरेशन सुरू आहे. या ऑपरेशनदरम्यान सुरक्षादलाच्या जवानांना मोठं यश मिळालं आहे. बसवा राजू याचा खात्मा झाला आहे.

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षादलाचं मोठं ऑपरेशन सुरू आहे. या ऑपरेशनदरम्यान सुरक्षादलाच्या जवानांना मोठं यश मिळालं आहे. आतापर्यंत या चकमकीमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांचा मोठा नेता नंबाला केशव राव हा देखील या चकमकीमध्ये ठार झाला आहे, नंबाला केशव याला बसवा राजू नावानं देखील ओळखलं जातं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या कामगिरीबद्दल ट्विट करत जवानांचं कौतुक केलं आहे.
‘नक्षलवाद निर्मुलनाच्या लढाईमध्ये आज आणखी एक ऐतिहासिक पाऊल पडलं आहे. छत्तिसगडमधील नारायणपूर येथे सुरक्षा दलाने 27 नक्षलवाद्यांना ठार केलं. यामध्ये सीपीआय-माओवादी संघटनेचा सरचिटणीस असलेला नंबला केशव राव उर्फ बसवा राजू याचा देखील समावेश आहे. बसवा राजू हा नक्षलवादी चळवळीचा कणा होता, आणि आता हाच कणा आपल्या जवानांनी मोडला आहे. याबद्दल मी आपल्या जवानांचं कौतुक आणि अभिनंदन करतो. ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’दरम्यान तेलंगणा आणि महाराष्ट्रातून 54 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर 84 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे. 2026 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे,’ असं ट्विट अमित शाह यांनी केलं आहे.
कोण आहे बसवा राजू?
बसवा राजू हा सीपीआय-माओवादी संघटनेचा सरचिटणीस होता. तो गेल्या 45 वर्षांपासून नक्षल चळवळीत कार्यरत होता.2018 साली सीपीआय-माओवादी संघटनेचा सरचिटणीस गणपती याच्या जागेवर बसवा राजू याची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. त्याने आरईसी वारंगल महाविद्यालयातून बिटेकची पदवी घेतली होती. तो अभियंता होता, तसेच तो ज्युनियर महाविद्यालयात कबड्डीपट्टू देखील होता. बसवा राजू हा आयईडी स्फोटक तयार करण्यात एक्सपर्ट होता.
जवानांवर हल्ले
सीपीआय-माओवादी संघटनेचा सरचिटणीस असलेल्या बसवा राजू याने यापूर्वी सुरक्षा दलाच्या जवानांवर देखील हल्ले केले होते. तो 70 वर्षांचा होता. अखेर आज त्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.