GPS च्या नादात कार पुढे गेली आणि पुलावरुन कोसळली, तीन जण ठार

जीपीएसचा वापर केल्याने कार थेट अर्धवट पुलावरुन नदीत कोसळून तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाने जीपीएसवर जास्त विसंबने किती धोक्याचे आहे हे स्पष्ट झाले आहे.

GPS च्या नादात कार पुढे गेली आणि पुलावरुन कोसळली, तीन जण ठार
| Updated on: Nov 24, 2024 | 8:31 PM

जीपीएस सिस्टीमच्या भरोशावर तुम्ही तुमचा रस्ता शोधत असाल तर तो तुमच्या जीवनाचा अखेरचा दिवस देखील ठरू शकतो अशी भयानक घटना घडली आहे. लग्नाच्या सोहळ्याला जात असलेल्या तिघा मित्रांचा एका विचित्र कार अपघातात मृत्यू झाला आहे.यांच्या कुटुंबियांनी हा अपघात जीपीएस यंत्रणेमुळे झाला असल्याचा दावा केला आहे. कारण हे मित्र जीपीएसचा वापर करुन कार चालवत होते.

उत्तर प्रदेशातील खालपूर – दातागंज मार्गावर सकाळी दहाच्या सुमारास हा कार अपघात घडला. या कारमधून हे तरुण बरेलीहून बदायू जिल्ह्यातील दातागंज येथे जात असताना एका बांधकाम अर्धवट असलेल्या पुलावर कार गेली आणि पुल संपल्यानंतर थेट रामगंगा नदीत कार कोसळली. या दुर्घटनेत तीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. कारचा चालक नेव्हीगेशन सिस्टीमचा वापर करत होता असे पोलिसांनी सांगितले.त्याला पुल अर्धवट असल्याचे माहिती नव्हते आणि त्यांची कार ५० फूटावरुन कोसळली आहे.

नातेवाईकांचा आरोप

हा अपघात रामगंगा नदीवर फरीदपूर – बदायूँच्या दातागंजला जोडणाऱ्या अर्धवट पडलेल्या पुलावर झाली. या पुलाला अर्धवट ठेवल्याने त्याच्या कडेला बॅरिकेट्स देखील लावलेले नव्हते, त्यामुळे पुल अर्धवट पडलेला आहे हे चालकाला कळले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या अपघातात मैनपुरी येथे राहणारे कौशल कुमार,फर्रुखाबादचे विवेक कुमार आणि अमित यांचा मृत्यू झाला आहे. ही कार दातागंजच्या दिशेने येत होती. आणि अर्धवट पुलावर चढली आणि पुल समाप्त होताच नदीत कोसळली.