Changur Baba : छांगूर बाबाच्या कोठीत सापडलं एक पुस्तक, ATSचं डोकंच फिरलं; असं काय लिहिलंय त्या पुस्तकात?
उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील जलालुद्दीन ऊर्फ छांगूर पीर बाबाच्या एका मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला आहे. छांगूर बाबाचं सिंडिकेट केवळ धर्मांतर घडवून आणण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर त्यांचा हेतू भारतातील एकोपा खंडित करणं होता, असं यंत्रणेचं म्हणणं आहे. त्यामुळेच ईडी आणि एटीएस या सिंडिकेटशी संबंधित इंटरनॅशनल कनेक्शन आणि हवाला नेटवर्कचा कसून तपास करत आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न यंत्रणांकडून केला जात आहे.

उत्तर प्रदेशात एटीएसच्या तपासात छांगूर बाबाच्या संपूर्ण षडयंत्राचा खुलासा करणाऱ्या एका पुस्तकाचा शोध लागला आहे. एटीएसच्या हाती हे पुस्तक लागलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसला छांगूर बाबाने सांगितलेल्या ठिकाणी ‘शिजर-ए-तैयबा’ नावाचं पुस्तक सापडलं आहे. या पुस्तकाचा वापर कथितपणे लव्ह जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर घडवून आणण्यासाठी केला जात असल्याचं एटीएसचं म्हणणं आहे. त्यामुळे हे पुस्तक पाहिल्यावर एटीएसच्या अधिकाऱ्यांचं डोकंच फिरल्याचं सांगितलं जात आहे.
‘शिजर-ए-तैयबा’मध्ये काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, छांगूर बाबाने स्वत: हे पुस्तक छापलं होतं. याचा हेतू धार्मिक प्रचाराचा नव्हता, तर एका विशेष अजेंड्याच्या माध्यमातून ब्रेनवॉश करायचा होता. या पुस्तकात मुस्लिम तरुण आणि हिंदू तरुणींना इस्लामच्या नावाने जोडण्यासाठी प्रेरित करण्याचा या मागचा हेतू होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुस्तकात धर्मी लोकांची सेना असा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजे इस्लामसाठी जीवही द्यायला तयार असणारे लोक असा याचा अर्थ होतो. लोकांना इस्लामकडे कसे आकर्षित करायचे याची माहितीही या पुस्तकात देण्यात आली आहे. तसेच कशा पद्धतीने धर्मांतराची मोहीम राबवली पाहिजे, याची माहितीही या पुस्तकात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
लव्ह जिहादचा खेळ
एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छांगूरने धर्म प्रचाराच्या नावाखाली हे पुस्तक तयार केलं. पण त्यांचा मूळ हेतू लव्ह जिहाद आणि बेकायदेशीरपणे धर्मांतर करणं आहे. तरुणांचा खासकरून तरुणींचा ब्रेन वॉश करून त्यांना इस्लाममध्ये आणण्यासाठी हा पुस्तकाचा वापर केला जात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल नेटवर्किंग आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हे पुस्तक तरुणांपर्यंत पोहोचवलं जात होतं. तरुणांनी कट्टरपंथी विचारधारेकडे वळावं यासाठी हे पुस्तक तरुणांना दिलं जायचं.
तपास सुरू
या पुस्तकाच्या किती प्रति तयार करण्यात आल्या होत्या? हे पुस्तक कुठे कुठे पाठवलं होतं, कोणत्या कोणत्या लोकांच्या मार्फत पुस्तक पोहोचवण्यात आलं? या पुस्तकाची विक्री कुणी केली? कुठे कुठे केली? याची माहिती मिळवण्याचं काम केलं जात आहे. तसेच या सर्व षडयंत्रात कोण कोण सामिल होतं याचाही तपास सुरू आहे. हे प्रकरण म्हणजे सुनियोजितपणे धर्मांतर आणि कट्टरपंथी विचारधारा पसरवण्याच्या षडयंत्राचा एक भाग असू शकतं, असं एजन्सींचं म्हणणं आहे. त्यामुळेच अटकेत असलेल्या छांगूर बाबाचा कसून तपास केला जात आहे.
