भारताच्या सरन्यायाधीशांवरच लैंगिक शोषणाचे आरोप, महिलेचं 22 न्यायाधीशांना प्रतिज्ञापत्र

भारताच्या सरन्यायाधीशांवरच लैंगिक शोषणाचे आरोप, महिलेचं 22 न्यायाधीशांना प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांच्यावर एका महिलेने खळबळजनक आरोप केला आहे. रंजन गोगोई यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप 35 वर्षीय महिलेने केला आहे. धक्कादायक म्हणजे ही महिला गोगोई यांची सुप्रीम कोर्टातील माजी सहकारी आहे. तिने सुप्रीम कोर्टाच्या 22 न्यायाधीशांना प्रतिज्ञापत्र लिहून रंजन गोगोईंवर हे आरोप केले आहेत. ही महिला एका कनिष्ठ न्यायालयात सहाय्यक म्हणून काम करते.

या महिलेने शुक्रवारी 19 एप्रिलला 22 न्यायाधीशांना पत्र लिहलं आहे. त्यामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्या राहत्या घरी 10 आणि 11 ऑक्टोबर 2018 रोजी लैंगिक शोषण केल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे.  त्यांनी मला कवेत घेऊन, माझ्या शरीराला नको तिथे स्पर्श केले. मला घट्ट पकडून गैरवर्तन केलं. मी स्वत:ची सुटका करुन बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र मला जाऊ दिलं नाही, असं या महिलेने शपथपत्रात म्हटलं आहे.  सरन्यायाधीशांनी आरोप फेटाळलेदरम्यान, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या सचिवांनी ई- मेलद्वारे हे आरोप फेटाळले आहेत. हे आरोप खोटे आणि अश्लाघ्य आहेत असा दावा त्यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायसंस्थेला बदनाम करण्यामागे कोणाचा तरी हात असू शकतो, हे मोठं षडयंत्र असू शकतं, असंही या ईमेलमध्ये म्हटलं आहे.

कोर्टात सुनावणी सुरु

दरम्यान, याप्रकरणी सुप्रीम कोर्टात तीन न्यायामूर्तींसमोर विशेष सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती अरुण मिश्र आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासमोर ही सुनावणी होत आहे. रंजन गोगोई यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या मते, “तक्रारदार महिला गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे. ज्यावेळी ती सेवेत रुजू झाली, त्यावेळीही तिच्यावर गुन्हा दाखल होता. या महिलेच्या पतीवरही दोन गुन्हे दाखल आहेत. या आरोपांमुळे प्रचंड दु:ख आणि मनस्ताप झाला.”

सरन्यायाधीश अत्यंत भावनिक

या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगोई अत्यंत भावनिक झालेले पाहायला मिळाले. 20 वर्षात असं कधीही झालं नाही. हा आरोप निव्वळ खोडसाळपणातून झाला आहे. या आरोपांमुळे प्रचंड दु:ख आणि मनस्ताप झाला, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले.

माझ्याकडे 6 लाख 44 रुपये आहेत. माझ्या शिपायाकडे माझ्यापेक्षा जास्त संपत्ती आहे, असं सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान सांगितलं. माझे सहकारी न्यायमूर्ती याप्रकरणी निर्णय देतील, असं सरन्यायाधीश गोगोई म्हणाले.

मला पुढील आठवड्यात महत्त्वाच्या सुनावण्या करायच्या आहेत. मात्र त्याला अडथळे निर्माण करण्यासाठीच असे आरोप होत आहेत, असं सरन्यायाधीश म्हणाले.

माध्यमे समजदार, प्रकरण नीट हाताळू शकतात

“तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणी आम्ही कोणताही न्यायालयीन आदेश देत नाही. सर्व माध्यमे आपल्या जबाबदाऱ्या चांगल्याप्रकारे समजतात. ते हे प्रकरण चांगल्याप्रकारे हाताळू शकतात”, असं नमूद केलं.

सरन्यायाधीश रंजन गोगोई कोण आहेत?

रंजन गोगोई हे भारताचे विद्यमान सरन्यायाधीश आहेत. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कर्तव्य बजावले आहे. 2012 नंतर गोगोई हे सर्वोच न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निवृत्तीनंतर, 3 ऑक्टोबर 2018 रोजी रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली. सरन्यायाधीश बनणारे रंजन गोगोई हे ईशान्य भारतातील पहिली व्यक्ती आणि पहिले आसामी नागरिक आहेत. गोगोई यांचे वडील केशब चंद्र गोगोई हे 1982 साली आसामचे मुख्यमंत्री होते.

12 जानेवारी 2018 रोजी भारताच्या इतिहास पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. त्या चार न्यायाधीशांमध्ये रंजन गोगोईही होते. न्यायालयातील प्रकरणांच्या वाटपावरुन या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषदेतून खंत व्यक्त केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *