मुख्यमंत्री उद्याच देणार राजीनामा, बिहार सचिवालयाची उद्याची सुट्टी रद्द
देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार आहे. यामुळे इंडिया आघाडीला मोठा झटका लागणार आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे महाआघाडीतून बाहेर पडणार आहेत. भाजपच्या पाठिंब्याने पुन्हा एकदा ते रविवारी 9व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Bihar : बिहारमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार रविवारी सकाळीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं कळतं आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर लगेचच रविवारी संध्याकाळपर्यंत नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, राजीनामा देण्यापूर्वी जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार हे विधीमंडळ पक्षाची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते भाजपच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा करतील.
राजकीय हालचालींचा जोर आल्याने आता उद्या रविवार असून देखील सचिवालयाचे सरकारी कार्यालये उघडी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्याच शपथविधी होण्याची शक्यता आहे. भाजपची देखील आज बैठक पार पडली आहे. दिल्लीतून आधीच हिरवा कंदिल मिळाला आहेय. त्यामुळे आता भाजपचे दोन उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. भाजपच्या आमदारांना देखील नितीश कुमार हे मुख्यमंत्री म्हणून चालणार आहेत. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. जेडीयू इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याने काँग्रेस आणि इतर विरोधकांना मोठा झटका लागला आहे.
रविवारी सचिवालयाची सुट्टी रद्द
रविवारी सकाळी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक सीएम हाउसमध्येच होणार आहे. बैठकीनंतर नितीश कुमार हे राजभवनात जाऊन राजीनामा देतील. त्यानंतर भाजपच्या आमदारांचं पाठिंब्याचं पत्र ते राज्यपालांना देतील. त्यानंतर 4 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळेच बिहार सचिवालयाची रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
जेडीयूचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घरी आता जेडीयूचे आमदार पोहोचत आहेत. मुख्यमंत्री आपल्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत.
भाजपने बिहारमधील स्थानिक नेत्यांना राजकीय परिस्थितीवर कोणतेही वक्तव्य करण्यास मनाई केली आहे. प्रवक्त्यांनाही मोजकेच बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी भाजपचे आमदार आणि खासदार यांची उद्या सकाळी 10 वाजता पक्ष कार्यालयात बैठक होणार आहेत. या बैठकीनंतर नितीशकुमार यांच्याशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.
