पाकिस्तानला जोरदार झटका, या जागतिक व्यासपीठावर चीनसह, मुस्लीम राष्ट्रांनी दिली भारताची साथ
BRICS Parliamentary Forum: भारताचा ब्रिक्स परिषदेमध्ये कुटनैतिक विजय झाला आहे. भारताच्या भूमिकेला चीन आणि मुस्लीम राष्ट्रांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.

BRICS Parliamentary Forum: जगभरात पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जागतिक व्यासपीठावर चीनलाही पाकिस्तानची साथ देता येत नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध ब्राझीलमध्ये आयोजित ब्रिक्स पार्लियामेंट्री फोरममध्ये करण्यात आला. तसेच दहशतवादाविरोधात संयुक्त पत्रक जारी करण्यात आले. या व्यासपीठावर भारताने पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती दिली. ब्रिक्समध्ये चीन आणि मुस्लीम राष्ट्रांनी घेतलेल्या भूमिका भारताचा हा कुटनैतिक विजय समजला जात आहे.
दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याचा संकल्प
ब्रिक्समध्ये भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण अफ्रीकासोबत ईराण, संयुक्त अरब अमीरात, इजिप्त, इथियोपिया आणि इंडोनेशिया हे देश आहे. या देशांच्या संसदीय मंचाची बैठक बाझीलमध्ये शुक्रवारी झाली. भारताकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या बैठकीत गेले. त्यात ब्रिक्सच्या सदस्यांनी दहशतवादाविरोधात एकत्र येऊन कारवाई करण्याचा संकल्प केला. त्याला चीन आणि मुस्लीम राष्ट्रांनी पाठिंबा दिला. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा झटका आहे.
भारताच्या या मुद्यांना पाठिंबा
बैठकीत बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, दहशतवाद आज जागतिक संकट बनले आहे. त्याचा सामना आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांच्या मदतीनेच केला जाऊ शकतो. त्यासाठी दहशतवादी संघटनांची आर्थिक मदत बंद झाली पाहिजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर गुप्त सूचनांची प्रक्रिया अधिक वेगाने झाली पाहिजे. तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य वाढले पाहिजे. ओम बिर्ला यांच्या या मुद्यांना सर्वच राष्ट्रांनी पाठिंबा दिला. त्यानंतर ब्रिक्सच्या अंतिम घोषणापत्रात दहशतवादाविरोधात लढा देण्याचा संकल्प करण्यात आला.
भारताच्या धोरणाची आणि नेतृत्वाची प्रशंसा ब्रिक्समध्ये करण्यात आली. जागतिक शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व सदस्य देशांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, यावर ब्रिक्स संसद सदस्यांनी भर दिला. ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्पष्ट आणि ठाम धोरणाचा पुनरुच्चार करत दहशतवादाविरुद्धचे झिरो टॉलरेंस धोरणही सांगितले. ब्रिक्समध्ये विविध जागतिक मुद्यांवर चर्चा झाली.
