संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक मोदी सरकारला घेरणार? काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय शिजतंय?

monsoon session : संसदीय पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू आहे. या अधिशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही महत्वाची बैठक आयोजित केली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक मोदी सरकारला घेरणार? काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय शिजतंय?
| Updated on: Jul 16, 2026 | 12:57 PM

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार 3-3 घटनादुरुस्ती विधेयके सादर केली जाण्याची शक्यता आहे. मागच्या अधिवेशनचा अनुभव घेता यंदा पूर्ण तयारीनिशी घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षही रणनिती आखण्यात व्यग्र आहे. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस पक्षाची मोठी बैठक सुरू आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत.

काँग्रेसच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासहित राहुल गांधी, प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल, शशी थरूर, पी. चिदंबरम, कुमारी शैलजा आणि मनीष तिवारी यांचा समावेश आहे. या बैठकीत आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागच्या अधिवेशनात हे विधेयक रोखण्यात विरोधकांना यश आलं होतं. परंतु यंदा तृणमूल काँग्रेस, ठाकरे गटाचे खासदार फुटल्याने राजकीय समीकरणात बदल झाला आहे. तर या विधेयकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या उपस्थितीत भाजपची देखील बैठक झाल्याचं कळतंय. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी अडीच तास बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन देखील उपस्थित होते. आता काँग्रेसची बैठक सुरू आहे.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी सत्ताधाऱ्यांचा प्लान काय?

दरम्यान, मोदी सरकारला विधेयक मंजूर करण्यासाठी 360 खासदारांची गरज भासणार आहे. सरकारकडे आतापर्यंत 324 खासदारांची संख्या झाली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही काल पाठिंबा देण्याविषयी हिंट दिली. 50 टक्के सूत्रानुसार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडल्यास पाठिंबा देण्याचा विचार करू, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सांगितले आहे. द्रमुक पक्षही या विधयेकावर सरकारला पाठिंबा देऊ शकतो. त्यामुळे आकडा ३५४ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वायएसआर आणि उद्धव ठाकरेंचे तीन खासदार एकत्र आल्यास मोदी सरकार मतदारसंघ पुर्नरचना विधयेक सहज मंजूर करू शकते.

Follow Us