फुलांच्या माळा, खणानारळाची ओटी, गायीच्या डोहाळे जेवणानिमित्त उठल्या गावभर पंगती

फुलांच्या माळा, खणानारळाची ओटी, गायीच्या डोहाळे जेवणानिमित्त उठल्या गावभर पंगती

तुम्ही डोहाळे जेवणाविषयी अनेकदा ऐकलं आणि पाहिलंही असेल. पण बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील एकसंबा गावात एका वेगळ्याच डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगली आहे.

अक्षय चोरगे

|

Jan 26, 2021 | 10:31 PM

बेळगाव : तुम्ही डोहाळे जेवणाविषयी अनेकदा ऐकलं आणि पाहिलंही असेल. पण बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील एकसंबा गावात एका वेगळ्याच डोहाळे जेवणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. कारण ही चर्चा आहे एका गायीच्या डोहाळे जेवणाची… खरं वाटत नाही ना? पण हे खरं आहे. एकसंबा येथील तुकाराम माळी या शेतकऱ्याने पोटच्या पोरीसारखं वाढवलेल्या गायीच्या डोहाळे जेवणाचा आनंद गावजेवण देऊन साजरा केला. यासाठी त्यांनी गावकऱ्यांसह पाहुण्यांनाही आमंत्रित केलं होतं.

एकसंबा येथील शेतकरी कुटुंबीयांनी गायीचा डोहाळेजेवण कार्यक्रम साजरा केला. प्रत्येक शेतकरी त्याच्याकडील प्रत्येक जनावरला त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणेच वागवतो. त्यातही प्रामुख्याने गायीला प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात विशेष स्थान दिलं जातं. परंतु माळी कुटुंबाने गायीचं डोहाळेजेवण घालून त्यांचं त्यांच्या गायीप्रती असलेले प्रेम व्यक्त केलं.

डोहाळे जेवण म्हटलं की, मग नटणं आलंच. त्यामुळे या गायीला साडी, फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून सोन्याचे मंगळसूत्र घालून छान नटवण्यात आलं. गोडधोड पदार्थांचा घरात सुगंध सुटला. गावातल्या आया-बाया डोहाळजेवणाच्या कार्यक्रमासाठी माळी यांच्या घरी जमा झाल्या. डोहाळेजेवण कार्यक्रमाची वेळ झाली. गौरीला (गायीचं नाव) मंडपात बांधण्यात आलं. लाऊडस्पीकरवर जोरजोरात गाणी लावण्यात आली. एकएक करत महिलांनी गौरीची ओटी भरत तिला ओवाळलं.

यावेळी डोहाळे जेवणासाठी महिलांनी खण नारळाने गायीचे ओटीभरणही केले. त्यानंतर पाच प्रकारची फळे गौरीला खाऊ घालण्यात आली आणि त्यानंतर डोहाळे जेवणाच्या पंक्तीही बसल्या. गौरी गायही आपल्या मुलीसारखीच आहे, असं सांगत माळी दाम्पत्याने मायेपोटी चक्क गौरी या गायीचे डोहाळे पुरवले आणि धुमधडाक्यात गावजेवण दिलं. आजवर गरोदर स्त्रियांसाठी डोहाळे जेवण घातलेलं आपण पाहिलं आहे. पण हा कृतज्ञता सोहळा वेगळाच होता.

डोहाळे जेवणाचा कौतुकसोहळा

गायीच्या डोहाळे जेवणाचा हा कौतुकसोहळा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी हजेरी लावत जेवणाचा आस्वाद घेतला. या दाम्पत्याने समाजासमोर पशुधन आणि पशुपालक यांच्या नात्यातला एक नवा आदर्श निर्माण केला. एखाद्या कुटुंबामध्ये नवीन पाहुणा (बाळ) येणार आहे म्हटलं की कुटुंबासह पै-पाहुण्यांचा आनंद गगनात मावत नाही. बाळ होणाऱ्या मातेचे औक्षण करून डोहाळे जेवण देऊन मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. पण एकसंबा येथे मात्र आगळा-वेगळा सोहळा पाहायला मिळाला.

गौरी गाय ही माळी कुटुंबातील सदस्य

तुकाराम माळी यांच्या कुटुंबीयांनी वर्षभरापूर्वी ही गाय विकत आणली होती. गाय घरी आलेल्या दिवसापासून घरात होत असलेली भांडणेही कमी झाली आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारली. हे सर्व पाहून तुकाराम माळी यांनी तिला घरची मुलगी म्हणूनच सांभाळायला सुरुवात केली. तसेच या गाईचे नाव गौरी असे ठेवले.

गोमातेच्या रक्षणाचा संदेश

गौरी गाय गेल्या पाच महिन्यांपासून गरोदर आहे. तेव्हापासून घरातील सर्वजण आनंदात आहेत. पाच महिन्यांनंतर आता डोहाळे जेवणासाठी घरासमोर मंडप घातला आणि घर फुलांनी सजवले. स्वतःच्या मुलांप्रमाणेच माळी दाम्पत्य जिव्हाळ्याने पशुधनाचा सांभाळ करतात. गायीला ज्याप्रमाणे मुलीसारखे वागवले त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. समाजामध्ये गायीवरील श्रद्धा, गायींचे आपल्या जीवनातील स्थान, तसेच पशुधनावर प्रेम करायला हवे, मानवाप्रमाणे गोमातेचे रक्षण झाले पाहिजे, असा संदेश समाजापुढे ठेवण्यासाठी हा उपक्रम राबण्यात आला आहे.

हेही वाचा

Artificial intelligence ची कमाल, 25 वर्षांपूर्वी निधन झालेल्या गायकाच्या आवाजात नवे गाणे

उपरका बाल मत काटो, टकलू हो जाऊंगा, नाकावर लटका राग, ‘त्या’ चिमुरड्याचा नवा व्हिडीओ

(Cow dohale jevan at Belgaum)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें