ताशी 100 किलोमीटर वेगाने हवा सुटली, ट्रेन, फ्लाईट रद्द… मोंथाचा तडाखा, महाराष्ट्रावरही मोठं संकट; पुढचे तीन दिवस…

Cyclone Montha : देशात मोंथा चक्रीवादळाने थैमान घातले असून अनेक विमाने रद्द करण्यात आली असून वीजपुरवठा काही भागात पूर्णपणे खंडीत झालाय. राज्यावर या चक्रीवादळाचे मोठे संकट आहे.

ताशी 100 किलोमीटर वेगाने हवा सुटली, ट्रेन, फ्लाईट रद्द... मोंथाचा तडाखा, महाराष्ट्रावरही मोठं संकट; पुढचे तीन दिवस...
Cyclone Montha
| Updated on: Oct 29, 2025 | 10:36 AM

मोंथा चक्रीवादळाचे संकट संपूर्ण देशावर आहे. पुढील तीन दिवस याचा प्रभाव बघायला मिळेल. या वादळाने थैमान घातले असून असंख्य फ्लाईट रद्द करण्यात आल्या असून काही भागात वीजपुरवठा पुर्णपणे खंडीत झाला. रस्त्यावर झाडे पडली असून काही ठिकाणी मोठे नुकसान झाले. समुद्राने राैद्ररूप धारण केलंय. मोंथा चक्रीवादळाचा सध्या ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये अधिक प्रभाव दिसतोय. महाराष्ट्रावरही याचे संकट कायम आहे. महाराष्ट्रातील काही समुद्र किनारपट्टीवर जोरदार वारे वाहताना दिसले. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असून भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिलाय. बुधवारी रात्री आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टनम किनाऱ्यावर वादळ धडकले, 90 ते 100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते.

या वादळाचा मोठा फटका आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये बसला असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. एकट्या आंध्र प्रदेशमध्ये 38,000 हेक्टरवरील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. यासोबतच घरांचे देखील मोठे नुकसान झालंय. हवामान खात्याने आधीच पाऊस आणि वादळाचा इशारा दिला होता. किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते.

मोंथा चक्रीवादळाचा परिणाम हा इतका जास्त बघायला मिळाला की, तब्बल 120 गाड्या रद्द करण्यात आल्या.  विशाखापट्टणमहून जाणारी 32 उड्डाणे रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे विजयवाडा विमानतळावरून जाणारी 16 उड्डाणे  रद्द करण्यात आली आहेत. अजूनही या वादळाचा धोका संपला नसून पुढील काही तास धोक्याची आहेत. रात्रभर प्रशासनाकडून रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला काढण्याचे काम सुरू होते.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मोंथा वादळाच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंडमध्ये आणि राजस्थान या राज्यात पाऊस पडू शकतो. पुढील काही तासात वादळाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र, पुढील काही तास वरील राज्यांसाठी धोकादायक असल्याचेही सांगितले जातंय. मोंथा चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान हे पिकांचे झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळतंय. महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने हजेरी लावली असून ढगाळ वातावरणही बघायला मिळतंय.