दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही, त्याला..; प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य

गोरखपूरमधील एका पत्रकार परिषदेत ममता कुलकर्णी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे ममता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूडपासून दूर असलेली ममता सध्या अध्यात्माकडे वळली आहे.

दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही, त्याला..; प्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य
दाऊद इब्राहिम
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 30, 2025 | 1:45 PM

बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा बऱ्याच अभिनेत्री आल्या, ज्यांनी खूप नाव कमावलं आणि अचानक त्यांनी इंडस्ट्रीला रामराम केला. या यादीत अभिनेत्री ममता कुलकर्णीचंही नाव आहे. करिअरच्या शिखरावर असताना तिने इंडस्ट्री अचानक सोडली होती. तिचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन जोडल्यानंतर स्टारडम हळूहळू कमी होऊ लागलं होतं. गेल्या काही वर्षांपासून ममता अध्यात्माकडे वळली असून महाकुंभदरम्यान ती भारतात आली होती. आता नुकत्याच एका पत्रकार परिषदेत तिने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल असं वक्तव्य केलंय, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गोरखपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत ममताने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं नाव घेत तो दहशतवादी नसल्याचं म्हटलं आहे.

ममता कुलकर्णी पुढे म्हणाली की, “बॉम्बस्फोट किंवा कोणत्याही कटात त्याचं नाव कधीच समोर आलं नाही. मीडिया आणि राजकीय शक्तींनी अनेक वर्षांपासून दाऊदला चुकीच्या पद्धतीने सर्वांसमोर मांडलंय.” गोरखपूरला पोहोचलेल्या ममताने तिथे बाबा गोरक्षनाथ मंदिरात पूजा केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. नव्वदच्या दशकांत हिंदी चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारून प्रकाशझोतात आलेली ममता आता अध्यात्मिक आयुष्य जगतेय.

प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर बनल्यानंतर ममता कुलकर्णी चांगलीच चर्चेत आली होती. या पदावरून वाद झाल्यानंतर तिला राजीनामासुद्धा द्यावा लागला होता. त्याच्या दोन दिवसांनंतर पुन्हा तिला महामंडलेश्वरचं पद देण्यात आलं. ममता कुलकर्णीचं नाव आता यमाई ममता नंदगिरी असं आहे.

बॉलिवूड सोडल्यानंतर ममता दुबईत राहत होती. जवळपास 25 वर्षांनंतर ती गेल्या वर्षी भारतात परतली होती. त्यानंतर तिने संन्यास घेण्याचं जाहीर केलं होतं. प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान तिने किन्नर अखाड्यातून दीक्षा घेतली. महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ममताचं पिंडदान करत तिचा पट्टाभिषेक केला होता. त्यानंतर तिला महामंडलेश्वरचं पद मिळालं होतं. परंतु याला प्रचंड विरोध झाल्यानंतर ममताने राजीनामा दिला होता.

ममता कुलकर्णी तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. 1993 मध्ये अभिनेत्रीने स्टारडस्ट मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. हे मासिकाचे प्रकाशित होताच बर्‍यापैकी खळबळ उडाली होती. यानंतर तिला 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. ममताबद्दल असं नेहमीच म्हटलं जात होतं की, तिने विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी लग्न केलं. परंतु, अभिनेत्रीने याचा कधी उल्लेख केला नाही आणि नेहमीच ती केवळ एक अफवा असल्याचं म्हटलं गेलं.