ईडी झालं, सीबीआय झालं आता ‘आप’वर एसीबीचे छापे; आम आदमीचा आणखी नेता अडचणीत

| Updated on: Sep 16, 2022 | 6:59 PM

वक्फ बोर्डप्रकरणी कारवाई केल्यानंत अमानतुल्लाह यांनी सांगितले की, वक्फ बोर्डाचे सीईओच्या सांगण्यानुसार ही कारवाई केली जात आहे.

ईडी झालं, सीबीआय झालं आता आपवर एसीबीचे छापे; आम आदमीचा आणखी नेता अडचणीत
आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना अटक
Follow us on

नवी दिल्लीः दिल्लीतील मद्य घोटाळ्यानंतर (wine scam) अजूनही आम आदमी पक्षावरचे संकट टळले दिसून येत नाही. आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या (Aamdar Amanatullah Khan) अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसून येत आहे. शुक्रवारी एसीबीकडून खान यांच्या अनेक ठिकाणी धाड टाकण्यात आली असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु केली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या राहत्या घरावर अन्य पाच ठिकाणी धाड टाकली आहे. त्यांच्यावरील ही कारवाई वक्फ बोर्डसंदर्भात असल्याचे सांगितले जात आहे.

एसीबीकडून धाड टाकण्यात आल्यानंतर अमानतुल्ला यांच्या घरामध्ये परदेशी बनावटीचे आणि विना परवान्याचे पिस्तुल सापडले आहे. हे पिस्तुल त्यांचे बिझनेस पार्टनर हमीद अलीच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याबरोबरच 12 लाख रुपयांची रोकडही ताब्यात घेतली गेली आहे. यानंतर एसीबीकडून जामिया, ओखला, गफूरनगरमध्येही धाड टाकली गेली आहे.

वक्फ बोर्डप्रकरणी कारवाई केल्यानंत अमानतुल्लाह यांनी सांगितले की, वक्फ बोर्डाचे सीईओच्या सांगण्यानुसार ही कारवाई केली जात आहे. वक्फ बोर्डमध्ये ज्या लोकांची नियुक्ती केली गेली आहे त्या लोकांची नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने झाली नसून ती कायमस्वरुपी तत्वावर झाली आहे.

वक्फ बोर्डमध्ये जी कर्मचारी भरती केली आहे, ती गुणवत्तेच्या आधारेच केली आहे. त्यानंतरही 2022 मधील याबाबतचा अहवाल मागविण्यात आला तोही आम्ही दिला आहे.

तरीही माझ्याविरोधात 23 ते 24 गुन्हे दाखल केले असल्याचेही अमानतुल्लाहनी सांगितले.

एसबीकडून कारवाई झाल्यानंतर खान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, प्रत्येक वेळी कोणत्याही अनोळखी व्यक्तीची तक्रार असली तरी हे लोक मलाच चौकशीसाठी बोलावतात.

वक्फ बोर्डावर मी 125 कायमस्वरुपी कर्मचार्‍यांसाठी प्रस्ताव पाठवला होता पण तो मान्य झाला नाही. त्यामुळे कंत्राटी कामगार ठेवावे लागले. त्यामुळे ही नियुक्ती करताना समितीकडून गुणवत्तेच्या आधारेच लोकांची नियुक्ती केली गेली आहे.

वक्फ बोर्डाच्या बँक खात्यात आर्थिक घोटाळा, वक्फ बोर्डाच्या संपत्ती भाडेतत्त्वावर देणे, वाहन खरेदीत घोटाळा, दिल्ली वक्फ बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन करुन 33 जणांच्या नियमबाह्य नियुक्त्यांचा आरोप असून या प्रकरणी एसीबीकडून कारवाई केली गेली आहे.