कोट्यवधी रूपये खर्च करून केजरीवाल यांनी उभारलेल्या ‘शीशमहल’चे काय होणार? रेखा गुप्ता यांचा मोठा निर्णय
दिल्लीच्या नव्या मुंख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 'शीशमहल'चे भविष्य सांगितले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा बंगला वादाचा विषय ठरला होता.

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा मान आता रेखा गुप्ता यांना मिळाला आहे. जवळपास २७ वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली. आज दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आहे. हा सोहळा रामलीला मैदानात दुपारी पार पडणार आहे. दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या ‘शीशमहल’चे काय होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या बंगल्यात वास्तवास होते. या बंगल्याच्या पुनर्निर्माण आणि डागडुजीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आता भाजपच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शपथविधी सोहळ्याआधीच या बंगल्याबाबात मोठा निर्णय घेतला आहे.
बुधवारी संध्याकाळी भाजपच्या प्रदेश कार्यालयात रेखा गुप्ता यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला.या मुलाखतीमध्ये त्यांनी शीशमहल संदर्भात वक्तव्य केले. एका प्रश्नाचे उत्तर देत रेखा म्हणाल्या की, ‘आम्ही शीशमहल या वास्तूला एक म्यूजियम बनवणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले प्रत्येक वचन आम्ही पूर्ण करू. या पदासाठी माझी निवड केल्याबद्दल तुमचे आभार.’
न्यूज १८ शी संवाद साधताना रेखा गुप्ता यांनी शीशमहलवर स्पष्ट वक्तव्य केले. त्यांना, ‘तुम्ही शीशमहलमध्ये राहणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत त्यांनी ‘अजिबात नाही. तो जनतेच्या मेहनतीच्या पैशातून उभारलेला महल आहे. तो मी पुन्हा जनतेला समर्पित करते. जनतेने तेथे जाऊन तो पाहावा आणि त्यांना जाणीव होईल की त्यांच्या पैशांचा वापर कोणत्या कामासाठी करण्यात आला आहे’ असे म्हटले.
दिल्लीमधील ६ फ्लॅगस्टाफ रोड येथे स्थित असलेल्या या बंगल्यावरून भाजप आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये कित्येक वर्ष वाद सुरू होता. या बंगल्यासाठी बेकायदेशीररित्या कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे म्हटले जात होते. तसेच अरविंद केजरीवाल यांनी आजूबाजूचे बंगले एकत्र करुन त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याची चर्चा होती.
