नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संयमाचा बांध आज अखेर प्रजासत्ताक दिनी फुटला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीसाठी दिल्ली पोलिसांनी काही अटी ठेवल्या होत्या. मात्र, या अटींना धुडकावत शेतकरी दिल्लीत शिरले. दिल्ली पोलीस मुख्यालय ते राजपथाबाहेर आंदोलक शेतकरी धडकले. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला. अनेक आंदोलकांकडून पोलिसांवार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले. आंदोलकांचं उग्र रुप पाहता पोलिसांनीदेखील आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांवर लाठीचार्ज सुरु केला. अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. या भयानक हिंसक वातावरणाने संपूर्ण दिल्ली हादरली (Delhi Farmers agitation turns violent).