
दिल्लीच्या स्वामी चैतन्यानंद ऊर्फ पार्थसारथी प्रकरणात पोलिसांनी आणखी मोठी कारवाई केली आहे. आरोपी पार्थ सारथी अल्मोडाच्या ज्या गेस्ट हाऊसमध्ये विद्यार्थींनी सोबत राहायचा तेथे दिल्ली पोलिसांच्या टीमने छापा टाकला आहे. तेथील कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून या बाबाने कॉलेजच्या विद्यार्थींनीसोबत अनुचित प्रकार केल्याचा जबाब दिला आहे. या प्रकरणात आता स्वामीला मदत करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिला विद्यार्थींना धमकी द्यायच्या, दबाव टाकायच्या आणि पुरावे नष्ट करण्यास सांगायच्या असे उघडकीस आले आहे.
या प्रकरणात श्वेता शर्मा, भावना कपिल आणि काजल या तिघा महिलांना दिल्ली पोलिसांनी स्वामीला त्यांच्या कृत्यासाठी मदत केल्या प्रकरणात अटक केली आहे. या महिला हॉस्टेलच्या विद्यार्थींना स्वामीची दहशत दाखवायच्या आणि त्यांना तक्रार करण्यापासून परावृत्त करायच्या तसेच पुरावे नष्ट करण्यास विद्यार्थीनींवर या महिला दबाव टाकायच्या असे तपासात उघड झाले आहे. विद्यार्थींनीच्या योगाच्या फोटोवर स्वामी अशोभनिय टीप्पणी देखील केली होती.
तिघा महिला आरोपींना त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. तपासात हे उघड झाले आहे की पार्थसारथीला त्याच्या कृत्याबद्दल जराही पश्चाताप नव्हता. पोलिसांनी सर्व पुरावे जमा करुन कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.
या प्रकरणात स्वामी आणि त्यांच्या संस्थेवर गंभीर आरोप केले जात आहेत. दिल्ली पोलिस याचा सखोल तपास करत आहे. आणि दोषीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीतील या शारदा इन्स्टीट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट एण्ड रिसर्चवर स्वामीच्या हुकूमशाही आणि एकछत्री अंमल असल्याने त्याने ही काळी कृत्ये केल्याचे म्हटले जात आहे. येथील गरीब मुलींना तो टार्गेट करायचा. पोलिसांनी आतापर्यंत ३० हून अधिक मुलींची चौकशी केली आहे.
स्वामी हा हॉस्टेलमध्ये शिकणाऱ्या तरुणींना अश्लील एसएमएस करायचा आणि त्यांना आपल्या रुममध्ये बोलवायचा. न येणाऱ्या तरुणींचे मार्क कापण्याचीही धमकी द्यायचा. या कामात या हॉस्टेलच्या महिला वॉर्डन त्याला मदत करायच्या आणि स्वामी पाठवलेले एसएमएस डिलीट करायला लावायच्या. स्वामीला अशा प्रकारे त्या नेहमीच वाचवायच्या असे तपासात उघडकीस आल्याने या महिलांना आता दिल्ली पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.