Delhi Riots : CAA वरुन राडा, गोळीबार करणाऱ्याला बेड्या, दिल्ली नेमकी का धुमसतेय?

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध (CAA) नवी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाने काल (24 फेब्रुवारी) हिंसक वळण (Delhi Riots) घेतले.

Delhi Riots : CAA वरुन राडा, गोळीबार करणाऱ्याला बेड्या, दिल्ली नेमकी का धुमसतेय?

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध (CAA) नवी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाने काल (24 फेब्रुवारी) हिंसक वळण (Delhi Riots) घेतले. यावरुन ईशान्य दिल्लीत जाफराबाद, मौजपूर भागात काल (24 फेब्रुवारी) संध्याकाळी 7.30 ला मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यात मौजपूर भागातील नागरिकत्व सुधारणा कायद्यातील विरोधक आणि समर्थक आमने-सामने आले. यावेळी एका अज्ञाताने पोलिसांवर पिस्तूल रोखत गोळीबार केला. यात रतनलाल या पोलीस हवालदारासह पाच नागरिकांचा मृत्यू झाला. तर पोलीस अधिकाऱ्यासह अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी (Delhi Riots) झाले.

नुकतंच मौजपूर भागात बंदुकीच्या आठ गोळ्या चालवणाऱ्या तरुणाची ओळख दिल्ली पोलिसांना पटली आहे. शाहरुख असे त्या व्यक्ती नाव असल्याचं समोर येत आहे. तो त्या ठिकाणचा स्थानिक रहिवाशी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक यांचे आंदोलन सुरु आहे. काल या आंदोलनातील काही समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच रस्त्यांवरील वाहने, आजूबाजूची घरे, गोदाम-दुकाने यांनाही आग (Delhi Riots) लावली.

दिल्लीत आजही (25 फेब्रुवारी) तणावपूर्ण स्थिती आहे. सकाळी पहाटे जवळपास 5 बाईकला आग लावण्यात आली. यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा दिल्लीत पाहायला मिळत आहे. तर काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत मौजपूर आणि आसपासच्या परिसरात आगीच्या 45 घटना घडल्या. यात अग्निशमन दलाच्या एका गाडीवर दगडफेक झाली. तर एका गाडीला आंदोलकांनी आग लावली. यात अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी (Delhi Riots) झाले.

शाळा कॉलेज बंद

दिल्लीतील हिंसाचारानंतर जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, गोकूलपुरी, जौहरी एनक्लेव आणि शिव विहार ही मेट्रो स्टेशन पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी जमावबंदी करण्यात आली आहे. तसेच ईशान्य दिल्लीतील अनेक शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील कोणतीही अनैतिक घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर इतर राज्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कठोर कारवाईचे आदेश

गृहमंत्र्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री दिल्लीतील हिंसाचारानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने बैठक बोलवली. जवळपास रात्री 11 वाजता सुरु झालेली ही बैठक 1.30 वाजेपर्यंत सुरु होती. यात गृहसचिव, गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख, दिल्ली पोलीस, गृहमंत्रालयाचे इतर अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

“ही घटना अत्यंत चुकीची आहे. मुद्दाम वाद निर्माण केला जात आहे. लोकशाहीच्या मर्यादेत राहून आपल्या भावना व्यक्त केल्या गेल्या पाहिजेत. दोन महिने राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला तेव्हा देखील आम्ही अडथळा निर्माण केला नाही. आता दगडफेक केली जात आहे, जाळपोळ केली जात आहे, सरकार हे सहन करणार नाही. यावर कठोर कारवाई केली जाईल,” अशी प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी (Delhi Riots) दिली.

दिल्लीत हिंसाचार : कधी काय घडले?

 • 22 फेब्रुवारी (रात्री 10.30 वा.) – ईशान्य दिल्लीतील जाफरबाद मेट्रो स्टेशनच्या खाली सीएएला विरोध करणाऱ्या महिला जमा झाल्या. त्यांनी मेट्रो स्टेशनजवळ रस्ता रोको आंदोलन केले.
 • 23 फेब्रुवारी (सकाळी 9 वा.) – जाफरबाद मेट्रो स्टेशनजवळील रस्ता बंद असल्याने मोठ्या प्रमाणात ट्राफिक जामची समस्या उद्भवली. ज्यामुळे लोकांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना रस्ता रोको आंदोलन बंद करा, असे आवाहन केले. तर भाजप नेता कपिल मिश्रा ट्विट करत CAA ला समर्थन देण्यासाठी मौजपूर चौकात जमा होण्यास सांगितले.
 • 23 फेब्रुवारी (संध्याकाळी 3.30-4 दरम्यान) – CAA चे समर्थनार्थ आंदोलनावेळी कपिल मिश्रा यांनी प्रक्षोभक भाषण केले. त्यानंतर पोलिसांनी रस्ता खुला करण्यासाठी आंदोलकांना 3 दिवसांचा अल्टीमेटम दिला.
 • 23 फेब्रुवारी – बाबरपूरजवळ CAA चे समर्थन करणाऱ्यांनी काही लोकांवर दगडफेक करण्यात आली.
 • 23 फेब्रुवारी – मौजपूर, करावल नगर, बाबरपूर आणि चांद बाग परिसरात हिंसाचार सुरु झाला
 • 23 फेब्रुवारी (रात्री 9-11) – करावल नगर, मौजपूर, बाबरपूर आणि चांदबाग परिसरात आंदोलकांनी गाड्यांची जाळपोळ केली.
 • 24 फेब्रुवारी (सकाळी 10 वा.) – 23 फेब्रुवारीला रात्री पोलिसांनी दिल्लीतील सर्व स्थिती नियत्रंणात असल्याचा दावा केला. मात्र 24 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता CAA समर्थक आणि विरोधक एकमेकांसमोर आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
 • 24 फेब्रुवारी (दुपारी 12-1.30) – दुपारी बाबरपूर परिसरात काही जणांनी दगडफेक केली. काही जण या आंदोलनात मुखवटे घालून तलवार घेऊन रस्त्यावर उतरले. बाबरपूरसह करावल नगर, शेरपूर चौक, कर्दमपुरी आणि गोकलपुरी या भागातही हिंसाचार सुरु झाला.
 • 24 फेब्रुवारी – भजनपूरमध्ये बससोबतच काही वाहनांमध्ये जाळपोळ करण्यात आली. पेट्रोल पंपला काहींनी आग लावली. यात एका पोलिसाचा मृत्यू झाला. तर पोलीस उपायुक्त जखमी झाले.
 • 24 फेब्रुवारी – सकाळी सुरु झालेला हा हिंसाचार दिवसभर कायम होता. गोकलपुरीमध्ये एका टायर मार्केटला समाजकंटकांनी आग लावली.
 • 24 फेब्रुवारी – रात्री 10 वाजता मौजपूर आणि घोडा चौक परिसरात हिंसाचार झाला.

Published On - 10:40 am, Tue, 25 February 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI