Delhi Tractor Rally : दिल्ली हिंसाचारात 83 पोलीस जखमी, 45 ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल

काही आंदोलकांनी तर थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. काहींनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या हिसांचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:48 PM, 26 Jan 2021
Delhi Tractor Rally : दिल्ली हिंसाचारात 83 पोलीस जखमी, 45 ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं आणि राजधानी दिल्ली हादरुन निघाली. काही आंदोलकांनी तर थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. काहींनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या हिसांचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांचा आकडा 83 असल्याची माहिती PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. जखमी पोलिसांमधील 45 जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आल्याचंही कळतंय.(83 police personnel injured in violence during tractor rally in Delhi)

‘शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये झालेल्या बैठकीत ट्रॅक्टर रॅलीसाठी एक मार्ग ठरवून देण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सन्मानित करण्याची व्यवस्थाही पोलिसांनी केली होती. पण शेतकरी आंदोलकांनी हा मार्ग मानला नाही. निश्चित केलेल्या वेळेपूर्वीच ते निघाले. अनेक जागांवर त्यांनी हिंसक घटना घडवून आणल्या, त्यात दिल्ली पोलिसांचे अनेक कर्मचारी जखमी झाले आणि सरकारी मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे’, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आंदोलकांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

सेंट्रल दिल्लीतील आयटीओ परिसरात एका ट्रॅक्टर चालकानं पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तासाठी उभे असलेले पोलिस त्यावेळी सैरावैरा पळत सुटल्याचं पाहायला मिळालं. आंदोलकांची संख्या आणि त्यांची आक्रमकता यापुढे पोलिस हतबल झाल्याचं चित्र राजधानी दिल्लीत दिवसभर पाहायला मिळालं.

लाल किल्ल्याच्या भिंतीवरुन पोलिसांच्या उड्या

आंदोलक शेतकऱ्यांनी आज हिंसेच्या सगळ्या सीमा ओलांडल्याचं पाहायला मिलत होतं. लाल किल्ला या देशाच्या अस्मिता केंद्रावर जेव्हा पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला. तेव्हा हातात फक्त काठी असलेल्या पोलिसांनी लाल किल्ल्याच्या एका भिंतीवरुन उड्या मारण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जवळपास 30 ते 40 फूट उंच असलेल्या भिंतीवरुन उड्या मारताना अनेक पोलीस जखमी झाले आहेत.

बॅरिकेटिंग तोडून पोलिसांवर हल्ला

सेंट्रर दिल्लीतील आयटीओ परिसरात आज दिवसभर मोठी हिंसा पाहायला मिळाली. आंदोलकांना रोखण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेट्स तोडण्यात आहे. इतकच नाही तर बॅरिकेर्ट्स तोडून आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. त्यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी काही पोलिसांना मारहाण केल्याचंही दिसून आलं.

आंदोलकांनी एका पोलिसाला वाचवलं

दुसरीकडे आयटीओ परिसरातच एक पोलिस कर्मचारी आंदोलकांच्या ताब्यात सापडला. त्यावेळी काही आंदोलकांकडून त्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. पण काही संवेदनशील आंदोलकांनी या पोलिस कर्मचाऱ्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं. काही आंदोलकांच्या या संवेदनशिलतेमुळे हा पोलिस कर्मचारी वाचला असंच म्हणावं लागेल.

संबंधित बातम्या : 

Delhi Farmers Tractor Rally VIDEO : भयानक विद्रोह! आंदोलकांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

Kisan Tractor Rally: दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलीस-शेतकरी भिडले, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

83 police personnel injured in violence during tractor rally in Delhi