डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावताच भारताला बसला पहिला सर्वात मोठा झटका, परिणाम दिसण्यास सुरुवात, धक्कादायक बातमी समोर
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावला आहे, आता या टॅरिफचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे, भारताला पहिला झटका बसला असून, मोठी बातमी समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, अमेरिकेकडून लावण्यात आलेल्या या टॅरिफचा आता परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा मोठा फटका हा भारतातील सीफूड कंपन्यांना बसला आहे. टॅरिफनंतर सीफूड निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अवंती फीड्स, एपेक्स फ्रोजन फूड्स, जील आक्वा या प्रमुख कंपन्यांसह अनेक सीफूड कंपन्यांचे शेअर जवळपास 11 टक्क्यांनी घसरले आहेत. एपेक्स फूड्स या कंपनीच्या शेअर्समध्ये आकरा टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. बीएसईवर या शेअर्सची सुरुवात 202.90 रुपये प्रति शेअर्सने झाली होती.
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे, कारण अमेरिकेची बाजार पेठही भारतीय झिंगा निर्यातदारांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे भारतीय निर्यातदारांचा खर्च वाढणार आहे, तर दुसरीकडे नफ्याचं प्रमाण कमी होणार आहे. अशा स्थितीमध्ये अमेरिकन बाजारामध्ये भारतीय कंपन्यांसाठी स्पर्धेचं वातावरण राहणार नाही. आधीच जागतीक मागणी आणि पुरवठा यावर दबाव आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत भारतामधील सी फूड उद्योगांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. याचा फटका हा छोट्या गुंतवणूकदार कंपन्या आणि मोठे गुंतवणूकदार या दोघांवरही होणार आहे. जर डोनाल्ड ट्रम्प यांनी दीर्घ काळासाठी आपल्या टॅरिफच्या धोरणांमध्ये कोणताही बदल केला नाही तर याचा परिणाम हा भारतीय निर्यातदार कंपन्यांच्या शेअर्सवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असा अंदाज देखील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार अवंती फीड्स शेअर्समध्ये चार टक्के घसरण झाली आहे, एपेक्स फ्रोजन फूड्सच्या शेअरमध्ये 11 टक्क्यांची घसरण झाली आहे, तर जील एक्वाचे शेअर्स तीन टक्क्यांनी घसरले आहेत. वाटरबेस या कंपनीच्या शेअसमध्ये टॅरिफच्या पहिल्याच दिवशी चार टक्के घसरण झाली. अर्थतज्ज्ञांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा परिणाम हा भारताच्या जीडीपीवर होऊ शकतो. भारताचा जीडीपी 0.2 ते 0.6 ने कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
