
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त दावा केला आहे. पुन्हा एकदा त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाचं श्रेय स्वत:ला दिलं आहे. बुधवारी यूएस-सौदी इन्हेस्टमेंट फोरममध्ये प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत बोलताना ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. मी भारत आणि पाकिस्तानला जेव्हा 350 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली तेव्हा दोन्ही देशांनी युद्ध थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. एवढंच नाही तर मला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यावेळी फोन आला होता त्यांनी म्हटलं की आमचं काम झालं आहे, आता आम्ही युद्ध करणार नाहीत, असंही ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान भारताच्या वतीनं ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.
मी वाद सोडवण्यामध्ये एक्सपर्ट आहे, त्यावेळी भारत आणि पाकिस्तामध्ये अणु युद्ध सुद्धा झालं असतं. मात्र तेव्हा मी दोन्ही देशांना धमकी दिली, म्हटलं तुम्ही लढू शकता, मात्र मी दोन्ही देशांवर 350 टक्के टॅरिफ लावेल. अमेरिकेसोबत तुमचा कोणताही व्यापार होणार नाही, असं मी सांगीतल्यानंतर दोनच दिवसांमध्ये दोन्ही देशांनी माझ्यावर फोनवरू संवाद साधला. यामुळेच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम होऊ शकला, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी असा दावा देखील केला आहे की, मी भारत आणि पाकिस्तानला धमकी दिली होती, की तुम्ही जर युद्ध थांबवलं नाही तर मी तुमच्यावर 350 टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीमध्ये आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष वाढला तेव्हाच मी सर्व तयारी केली होती. मी आमच्या अर्थमंत्र्यांना देखील म्हटलं होतं की, आपण युद्ध सुरू राहिलं तर त्यांच्यावर 350 टक्के टॅरिफ लावू, मात्र जर दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा झाली तर आपण त्यांच्यासोबत एक चांगला व्यापार करू, मी फक्त टॅरिफची धमकी देऊन आठ पैकी पाच युद्धांमध्ये युद्धविराम घडवून आणला असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.
दरम्यान मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यावेळी फोन आला होता, त्यांनी मला म्हटलं आमचं काम झालं आहे, आता आम्ही युद्ध करणार नाही. मग मी त्यांना विचारलं की तुमचं नेमकं काय काम झालं आहे? त्यावर मोदींनी उत्तर दिलं की आता आम्ही युद्ध करणार नाही. त्यावेळी मी त्यांचे आभार मानले असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.