
नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीच्या तारखांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. निवडणूक आयुक्तांनी देशात सात टप्प्यात निवडणुका घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आजपासून देशभरात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने केवळ लोकसभाच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर केला आहे. चार राज्यातील या विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसोबतच या निवडणुका होणार असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, अरुणाचल प्रदेशात 60 आणि सिक्किममध्ये 32 जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर आंध्र प्रदेशात 175 आणि ओडिशात 147 जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. या चारही राज्यांच्या विधानसभांची मतमोजणी आणि निकाल 4 जून रोजी लागणार आहेत. याच दिवशी लोकसभेचेही निकाल लागणार आहेत.
अरुणाचल प्रदेश
अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 मार्च रोजी नोटिफिकेशन काढलं जाईल. 27 मार्चपर्यंत उमेदवार आपले अर्ज दाखल करू शकतात. तर 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. अरुणाचल प्रदेशात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी निकाल लागणार आहे. अरुणाचल प्रदेएशात 60 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
सिक्किम
सिक्किम विधानसभेसाठी एका टप्प्यात सर्वच्या सर्व 32 जागांवर मतदान होणरा आहे. सिक्किम विधानसभा निवडणुकीची नोटिफिकेशन 20 मार्च रोजी काढली जाणार आहे. 27 मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 30 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. राज्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सिक्किम विधानसभेचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे.
ओडिशा
ओडिशात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 जागांसाठी मतदान होईल. त्याचं नोटिफिकेशन 18 एप्रिल रोजी काढलं जाणार आहे. उमेदवारांना 25 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर 29 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 13 मे रोजी राज्यात पहिल्या टप्प्यासाठी मतदान होईल. मतमोजणी आणि निकाल 4 जून रोजी लागेल.
ओडिशात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील 35 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी 26 एप्रिल रोजी नोटिफिकेशन काढण्यात येणार आहे. नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 मे आहे. तर 6 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी आणि निकाल लागणार आहे.
आंध्र प्रदेश
आंध्रप्रदेश विधानसभेच्या 175 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणरा आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या तारखांनुसार आंध्र प्रदेश विधानसभेसाठी 18 एप्रिल रोजी नोटिफिकेशन जारी करण्यात येणार आहे. 25 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर 29 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. राज्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.