
Air India crash report: गुजरातमधील अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल आला आहे. या अहवालात विमान अपघाताच्या घटनेबाबत दोन कारणांचा उल्लेख केला आहे. परंतु हा प्राथमिक अहवाल असल्याने त्या कारणांची चौकशी सुरू आहे. या अहवालात बोईंग विमानांच्या इंधन स्विच लॉकवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यावर आता अमेरिकेच्या फेडरल एव्हियेशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) म्हटले आहे की, बोईंग विमानांचे इंधन स्विच लॉक सुरक्षित आहेत. अहमदाबादमधील विमान अपघाताचा प्रारंभिक अहवाल समोर आल्यानंतर एफएएची ही टिप्पणी आली आहे.
नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या अधिसूचनेत एफएएच्या म्हटले आहे की, इंधन नियंत्रण स्विचची रचना, ज्यामध्ये लॉकिंग वैशिष्ट्याचा समावेश आहे, विविध बोईंग विमान मॉडेलमध्ये सारखी आहे. एफएएने २०१८ मध्ये बोईंग ७८७ विमानातील इंधन नियंत्रण स्विच लॉकिंगमधील दोषाबद्दल इशारा दिला होता. तथापि त्याचा विचार करण्यात आला नाही.
एएलपीए इंडियाचे अध्यक्ष सॅम थॉमस यांनी सांगितले की, पायलटला आता सुपरवायझरप्रमाणे तपासणी पथकाचा भाग बनवले पाहिजे. २०१८ मधील रिपोर्टमध्ये इंधन लॉक सिस्टीमच्या सदोषतेबाबत संकेत दिले होते. विमानाने उड्डान घेतल्यानंतर एक पायलट दुसऱ्या पायलटला इंधन स्विच का बंद केले? असा प्रश्न विचारतो. तेव्हा दुसरा पायलट मी इंधन स्विच बंद केले नाही, असे सांगतो. उड्डानंतर इंधन स्विच ‘रन मधून कटऑफ’मध्ये आले, असे तपास पथकाच्या अहवालात म्हटले आहे. परंतु इंधन स्विच बंद कसे झाले? याचा कोणताही उल्लेख त्या अहवालात नाही.
शनिवारी दोन अमेरिकन सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले की, तपासात निरीक्षक होण्याच्या एएलपीए इंडियाच्या विनंती मान्य करत नाही. परंतु तपास अहवालात पायलटच्या चुकीबद्दल कोणताही पक्षपात दिसून येत नाही. एएलपीएचे अमेरिकन प्रतिनिधी जॉन कॉक्स यांनी तपास अहवाल वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष असल्याचे म्हटले आहे.