आंदोलनाचं ठिकाण बदलण्याच्या अटी अमान्य, शेतकऱ्यांनी अमित शाह यांच्या चर्चेचं आमंत्रण फेटाळलं

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं चर्चेचं आमंत्रण फेटाळलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:19 PM, 29 Nov 2020
आंदोलनाचं ठिकाण बदलण्याच्या अटी अमान्य, शेतकऱ्यांनी अमित शाह यांच्या चर्चेचं आमंत्रण फेटाळलं

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं चर्चेचं आमंत्रण फेटाळलं आहे. अमित शाह यांनी चर्चेसाठी शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन रस्त्यावरुन मैदानात हलवावं अशी पूर्वअट ठेवली होती. ही अट आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी फेटाळली आहे. सरकारने चर्चेला तयार होताना खुल्या मनाने आणि कोणतीही पूर्वअट न ठेवता तयार व्हावं, असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. शेतकरी संघटनांनी आज (29 ऑक्टोबर) सकाळी बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला (Farmers Reject HM Amit Shah Talks Offer and Venue Change condition for talk).

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात केंद्राच्या नव्या शेतकरी कायद्यांचं समर्थन करत यामुळे शेतकऱ्यांना नव्या संधी आणि अधिकार मिळतील, असा दावा केला होता. त्यानंतर शेतकरी संघटनेने सावध पवित्रा घेत गृहमंत्री अमित शाह यांचं चर्चेचं आमंत्रण फेटाळलं. तसेच सरकारने चर्चेसाठीही अटी ठेवल्यानं आपण दिल्लीच्या सीमेवरच आपलं आंदोलन सुरु ठेऊ असं म्हटलं. शेतकरी आंदोलनाच्या 7 सदस्यीय समितीने हा निर्णय घेतला. यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांचाही समावेश आहे.

सरकार शेतकरी आंदोलन मैदानांमध्ये नेऊन त्याचं रुपांतर जेलमध्ये करतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच दिल्ली पोलिसांनी दिल्ली सरकारकडे मैदानांचा वापर तात्पुरते तुरुंग म्हणून करण्यास परवानगी मागितली होती. मात्र, केजरीवाल सरकारने हा प्रस्ताव फेटाळला. तसेच आंदोलक शेतकरी दिल्लीचे पाहुणे असल्याचं म्हटलं.

अमृतसरच्या किसान संघटनेचे शेतकरी नेते जसकरण सिंग म्हणाले, “सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची अजिबात इच्छा नाही. त्यांना फक्त देशाला हे दाखवायचे आहे की ते चर्चेला तयार आहेत.” याआधी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री एम. एल. खट्टर यांच्यावर शेतकरी आंदोलनाची बदनामी केल्याचा गंभीर आरोप केला होता. खट्टर यांनी शेतकरी आंदोलनावर खलिस्तानी असल्याचा आरोप केला होता. यावर बादल यांनी शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी असे आरोप होत असल्याचं आणि षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला होता.

संबंधित बातम्या :

एकीकडे मोदी सरकारकडून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाता, तर दुसरीकडे दडपशाही : किसान संघर्ष समिती

Farmer Protest | मैदानांच्या खुल्या तुरुंगाच्या रुपांतराची दिल्ली पोलिसांची मागणी केजरीवाल सरकारने फेटाळली

 मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात किसान सभा रस्त्यावर, अकोल्यात भव्य मोर्चा

Farmers Reject HM Amit Shah Talks Offer and Venue Change condition for talk