
तेलंगणाच्या वारंगल येथे मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील स्पर्धकांचे पाय धुण्यासाठी महिलांची नियुक्ती करून त्यांच्याकडून स्पर्धकांचे पाय धुवून घेतले आहेत. त्यावर संपूर्ण तेलंगणा राज्यात संतापाची लाट पसरली आहे. केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी तेलंगणा सरकारच्या या कृत्याचा अत्यंत कडक शब्दात निषेध नोंदवला आहे. महिलांकडून दुसऱ्यांचे पाय धुवायला लावणं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट असल्याचं जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे.
हैदराबादमधील हायटेक्स एक्झिबिशन सेंटर येथे 31 मे 2025 रोजी मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेचे 72 वे पर्व पार पडणार आहे. अलीकडेच, काही स्पर्धकांनी तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यातील 800 वर्ष जुन्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्थळ असलेल्या रामप्पा मंदिराला सांस्कृतिक भेट दिली. यावेळी तेलंगणातील काँग्रेस सरकारने स्थानिक महिलांकडून मिस वर्ल्ड स्पर्धकांचे पाय धुवायला लावले होते. त्यामुळे संताप पसरला आहे. भाजपसह सर्वच पक्षाने या घटनेचा निषेध नोंदवला असून राज्यातील काँग्रेस सरकारला धारेवर धरलं आहे.
काँग्रेस सरकारने स्थानिक महिलांकडून स्पर्धकांचे पाय धुवायला लावणं ही एक अत्यंत लाजिरवाणी आणि गुलामगिरीच्या मानसिकतेची झलक देणारी घटना आहे. विशेष म्हणजे हे कृत्य रामप्पा मंदिराच्या पवित्र परिसरात, देवी समक्का-सारलम्मा यांच्या पूजास्थळी जवळच घडले आहे. राणी रुद्रम्मा देवींचे शौर्य ज्या भूमीत पिढ्यान्पिढ्या सांगितले जाते, त्या भूमीत तेलंगणातील महिलांची भूमिका परकीयांच्या पाय धुण्यापुरती मर्यादित करणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे, असा संताप केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.
In a shocking display of servility, the Telangana Congress government made local women wash and wipe the feet of Miss World contestants, a humiliating act that reeks of colonial-era mindset. Further, this was done within the sanctity of the Ramappa Temple and in an area in close… pic.twitter.com/ha0xRrTCYr
— G Kishan Reddy (@kishanreddybjp) May 15, 2025
आपल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीत ‘अतिथी देवो भव:’ या तत्त्वावर आधारित पाहुण्यांचे स्वागत केले जाते. मात्र पाहुण्यांचे स्वागत करताना आपल्या मातृशक्तीचा आत्मसन्मान पायदळी तुडवणे कधीही मान्य होणार नाही. मिस वर्ल्ड स्पर्धा हे भारतीय संस्कृती व अतिथी-सत्कार दाखवण्याचे एक सुवर्णसंधी होते, पण काँग्रेस सरकारने ही संधी गमावून महिलांचा अपमान केला. काँग्रेस पक्षाची शंभर वर्षांची परकीयांच्या चरणी लीन होण्याची परंपरा पुन्हा एकदा या प्रकारातून स्पष्ट झाली आहे. दिल्लीतील हायकमांडला खूश करण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणातील महिलांचा आत्मसन्मान पायदळी तुडवला आहे, असा हल्लाच रेड्डी यांनी चढवला आहे.
या प्रकारामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी तेलंगणातील महिलांची माफी मागावी. त्यांनी केलेला अपमान हा फक्त महिलांचा नाही, तर आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि ‘नारी शक्ती’चा घोर अवमान आहे. काँग्रेस सरकारच्या या कृतीचा भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करतो, असं केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी म्हटलं आहे.