निरोप आणि अलविदा यांच्यामधले ते आठ दिवस…
आज मी ज्या व्यक्तीला भेटत आहे, ती उद्या पुन्हा माझ्यासमोर नसेल, तर माझ्या मनात अशी कोणती गोष्ट अपूर्ण राहील, जी तिला सांगता आली नाही याची खंत मला आयुष्यभर वाटत राहील?

३० नोव्हेंबर २०२१ रोजी पेन्सिलने काढलेले एक चित्र घेऊन मी त्यांच्या कार्यालयात पोहोचलो होतो. हे चित्र मी स्वतः काढले होते. आयुष्यातील बराच मोठा काळ लोकांच्या सुरक्षेसाठी समर्पित करणाऱ्या व्यक्तीला माझ्याकडून दिलेली ती एक छोटीशी भेट होती, ज्यांना मी कधी भेटलोही नव्हतो. मला केवळ त्यांचे आभार मानायचे होते. पण अवघ्या आठ दिवसांनंतर त्यांच्यासोबत काढलेला तोच फोटो पाहून, इतका हसतमुख आणि उत्साही माणूस अचानक आपल्यातून कसा निघून गेला..,हे कोडे मला पडेल याची मला यत्किंचितही कल्पनाही नव्हती.
आयुष्यातील काही क्षण त्याच वेळी खास वाटतात, तर काही क्षण काळ पुढे सरकल्यानंतर अनमोल बनतात. माझ्यासाठी ती भेट असाच एक अनमोल क्षण ठरली.
जनरल बिपिन रावत यांची भेट घेतल्यानंतर मनात एक वेगळीच आत्मीयता निर्माण झाली. त्यांच्या आवाजात उत्साह होता आणि डोळ्यांत जीवनाबद्दलची दुर्मम्य अशी इच्छाशक्ती होती. मात्र, त्या भेटीची सर्वांत खोलवर मनात कोरली गेलेली आठवण म्हणजे त्यांचा गणवेश किंवा त्यांचे पद नव्हे, तर त्यांच्या कार्यालयातील एक जुने लाकडी टेबल !
गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितले की, ते टेबल एकेकाळी फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांचे होते. पुढे ते निरुपयोगी समजून एका बाजूला ठेवण्यात आले होते. जनरल रावत यांनी ते दुरुस्त करून घेतले आणि मोठ्या आदराने आपल्या कार्यालयात वापरायला सुरुवात केली. त्या टेबलाविषयी ते ज्या आपुलकीने सांगत होते, ते पाहून एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबातील जुनी आठवण… जपून ठेवलेल्या वस्तूबद्दल सांगत आहे, असे वाटत होते.
एवढ्या मोठ्या पदावर असलेली व्यक्ती आपल्या आधी या देशाची सेवा केलेल्या माणसाची आठवण इतक्या प्रेमाने जपते, ही गोष्ट मनाला स्पर्शून गेली. मी त्यांचे आभार मानायला गेलो होतो; पण नकळत ते मला दुसऱ्यांचा आदर कसा करावा, याचा धडा शिकवत होते.
आजही विचार करतो, त्या जुन्या टेबलात असे काय होते? त्याची किंमत लाकडात नव्हती, तर त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आठवणींमध्ये होती. कधीकाळी त्या टेबलावर बसून कुणीतरी देशाच्या हिताचे निर्णय घेतले असतील. कुणीतरी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या असतील. ते टेबल जपून ठेवून जनरल रावत हे त्या व्यक्तीची सेवा आणि योगदान यांची आठवण जिवंत ठेवत होते.
कदाचित खरा आदर म्हणजे केवळ एखाद्याच्या यशाचे कौतुक करणे नव्हे… तर आपल्याआधी या जगात येऊन गेलेल्या माणसांना आपण आपल्या आयुष्यात किती आदराचे स्थान देतो, हेही तितकेच महत्त्वाचे असते.

आणि अखेर आला ८ डिसेंबर २०२१!
हेलिकॉप्टर दुर्घटनेची बातमी ऐकून त्यावर विश्वास ठेवणे कठीण झाले होते. माझे मन वारंवार त्याच कार्यालयात जाऊन पोहोचत होते. त्यांचा आवाज, त्यांचा उत्साह, ते जुने टेबल, मी काढलेले चित्र आणि आमचा एकत्रित फोटो… आमच्या भेटीपासून त्यांच्या जाण्यापर्यंत अवघे आठ दिवसांचे अंतर होते…
त्या छायाचित्रात सर्व काही पूर्वीसारखेच होते; पण ते पाहताना माझ्या मनात मात्र खूप काही बदलले होते. काय घडले आहे, हे बुद्धीला समजत होते; पण मन ते स्वीकारायला तयार नव्हते.
तेव्हाच मनात एक प्रश्न निर्माण झाला. एखाद्या क्षणाचे महत्त्व तो क्षण निघून गेल्यानंतरच आपल्याला का कळते?
आपण एखाद्याला भेटतो, गप्पा मारतो, हसतो आणि निरोप घेऊन निघून जातो. पुन्हा भेट होईल, असे गृहीत धरतो. आज जे बोलता आले नाही, ते पुढच्या भेटीत सांगता येईल, असे वाटते. प्रत्येक भेट एक दिवस आठवण बनणार आहे, हे माहीत असूनही आजची भेट कदाचित शेवटची ठरू शकते, असा विचार आपल्या मनाला कधी शिवतही नाही.
कदाचित याच विश्वासावर आयुष्य सहजपणे पुढे सरकत असते. पण हाच विश्वास कधी कधी आपल्याला आपल्या माणसांबाबत निष्काळजीही बनवतो का?
एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर आपण तिचे शेवटचे शब्द आठवू लागतो. तिचे हसू, आवाज आणि छोट्या छोट्या सवयींमध्ये काहीतरी वेगळा अर्थ शोधू लागतो. पण त्या दिवशी झालेल्या आमच्या गप्पा भविष्यात घडणाऱ्या एखाद्या घटनेचा संकेत नव्हत्या. तो आयुष्यातील एक अगदी सामान्य दिवस होता. येणाऱ्या आठ दिवसांत काय घडणार आहे, याची ना मला कल्पना होती, ना त्यांना…
कदाचित याच गोष्टीत त्या भेटीचे सर्वांत मोठे सत्य दडलेले आहे. मी त्यांचे आभार मानले, तेव्हा ते ऐकण्यासाठी ते माझ्यासमोर होते. मात्र, पुन्हा कधीही अशी संधी मिळणार नाही, याची मला कल्पना नव्हती.
कधी कधी मनात विचार येतो, त्या दिवशी मी ती भेट पुढे ढकलली असती तर? काही काम निघाले असते, एखादी महत्त्वाची बैठक आडवी आली असती किंवा पुढच्या आठवड्यात भेटू, असा विचार मी केला असता तर? त्या क्षणी त्यात काहीच असामान्य वाटले नसते. पण आज मनात एक अपूर्णता कायम राहिली असती.
याचा अर्थ असा नाही की आपण सतत कुणाला गमावण्याच्या भीतीत जगावे. मुद्दा एवढाच आहे की, मनातल्या चांगल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण उशीर का करतो?
आपण एखाद्याचा आदर करतो, पण त्याला सांगत नाही. कुणाचे तरी आपल्यावर उपकार असतात, आपण त्यांचे ऋणी असतो; पण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दच शोधत राहतो. कुणावर प्रेम असते, पण एखाद्या छोट्याशा नाराजीला त्या प्रेमापेक्षा मोठे करून टाकतो.
आपल्या प्राचीन शिकवणींमध्ये जीवनाच्या क्षणभंगुरतेचा उल्लेख वारंवार येतो. पण त्याबद्दल वाचणे आणि ती गोष्ट स्वतःच्या आयुष्यात अनुभवणे, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
एखाद्या लहान मुलाला माहीत असते की, फूल एक दिवस कोमेजून जाणार आहे. तरीही ते मूल आनंदाने कुणाला तरी फूल देत असते. मात्र, आपण मोठे होत जातो, तसतसा अधिकाधिक विचार करू लागतो आणि अनेकदा काहीतरी देण्यातला आनंदच विसरून जातो.
मी काढलेले ते चित्र काही फार मोठी भेट नव्हती. त्याचे खरे मोल त्यामागच्या भावनेत होते. ज्या भावनेने मी ते त्यांना दिले आणि ज्या आपुलकीने त्यांनी ते स्वीकारले, त्यातच त्या भेटीचे खरे सौंदर्य होते.
आपण एखाद्या व्यक्तीची ओळख तिचे पद, प्रतिष्ठा आणि कर्तृत्व यांवरून करून घेतो. पण तिच्या छोट्या छोट्या कृती तिच्या मनातील मोठेपणा सांगून जातात.
जनरल रावत यांचे ते जुने टेबल मला आजही आठवण करून देते की, आज आपण जे काही आहोत, त्यात आपल्याआधी आलेल्या अनेकांचे योगदान असते.
मी माझ्या आयुष्यात अशा माणसांची आठवण ठेवली आहे का? त्यांच्याविषयीचा आदर वेळेत व्यक्त केला आहे का? आणि जेव्हा मी माझ्या जबाबदाऱ्या मागे ठेवून या जगातून निघून जाईन, तेव्हा लोकांना माझ्या वागण्यातली कोणती गोष्ट आठवेल?
आजही कधी कधी तो आमचा एकत्रित फोटो पाहतो. त्या छायाचित्रात जनरल रावत आहेत, त्यांच्याविषयीचा आदर आहे आणि माझी ती छोटीशी भेटही आहे. पण माझ्या मनात मात्र त्या जुन्या टेबलाची आठवणही कायम आहे.
त्या दिवशी मी त्यांना काहीतरी देण्यासाठी गेलो होतो; पण परतताना माझ्यासोबत अशी एक आठवण घेऊन आलो, जी आजही मला आतून काहीतरी शिकवत आहे…
कदाचित कृतज्ञतेचा सर्वांत खोल अर्थ म्हणजे एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर तिच्याविषयी चांगले बोलणे नव्हे, तर ती आपल्यासोबत असतानाच मनातील खरी भावना तिच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे…
त्या आठ दिवसांची आठवण झाली की आजही मनात एक प्रश्न निर्माण होतो…
आज मी ज्या व्यक्तीला भेटत आहे, ती उद्या पुन्हा माझ्यासमोर नसेल, तर माझ्या मनात अशी कोणती गोष्ट अपूर्ण राहील, जी तिला सांगता आली नाही याची खंत मला आयुष्यभर वाटत राहील?
