लवकर लग्न करा, दोन पेक्षा अधिक अपत्य जन्माला घाला, हिंदू तरुणांना कुणाचं आवाहन, कुंभमेळ्यातील प्रस्ताव व्हायरल
Kumbha Mela Hindu Marriage Proposal Viral : लवकर लग्न करा आणि दोनपेक्षा अधिक अपत्य जन्माला घाला असे आवाहन हिंदू तरुणांना करण्यात आले आहे. कुंभमेळ्यात याविषयीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तो समाज माध्यमांवर पण व्हायरल झाला आहे.

लवकर लग्न करा आणि दोनपेक्षा अधिक अपत्य जन्माला घाला, असा अजब सल्ला हिंदू तरुणांना देण्यात आला आहे. हिंदूच्या घटत्या जन्मदरावर चिंता व्यक्त करत हा तोडगा सुचवण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी कुंभमेळ्यात याविषयीचा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आला आहे. तो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यासाठी बांगलादेशातील हिंदूच्या सध्यस्थितीचा दाखला देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुस्लिमांच्या अपत्य जन्मदरावर अप्रत्यक्ष चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण?
कुंभमेळ्यात प्रस्ताव मंजूर
“हिंदू तरुणांनी लवकर लग्न करावं आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त अपत्यांना जन्म द्यावा” असा विश्व हिंदू परिषदेच्या प्रयागराज येथील ‘कुंभमेळ्यातील केंद्रीय बैठकीत महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, याविषयीची माहिती विश्व हिंदू परिषद, महाराष्ट्र- गोवाचे महामंत्री गोविंद शेंडे यांनी दिली आहे.




हिंदू लोकसंख्या वाढ मिशन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांचं हिंदूची लोकसंख्या वाढीचं मिशन हाती घेण्यात आल्याचे समोर येत आहे. सध्या मुस्लीम जन्मदराचा दाखल देत भविष्यात लोकसंख्या असंतुलनामुळे हिंदू अनेक राज्यात अल्पसंख्याक होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून हिंदूचा प्रजनन दर वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
भारतातील लोकसंख्या असंतुलन हिंदूंच्या अस्तित्वासाठी घातक असल्याचा धोका हिंदू संघटनांना जाणवत आहे. शिकेलेली मुलं उशीरा लग्न करतात, अपत्य होऊ देत नाही. झालं तर एक अपत्य जन्माला घालतात. यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी झालीय, असे एक कारण पुढे आले आहे. एकीकडे दुसरे समाजांची लोकसंख्या वाढत आहे, हिंदूंची तुलनेने कमी होत असल्याने संत समाज चिंतेत, असल्याचे महामंत्री शेंडे यांनी मत व्यक्त केले आहे.

प्रस्ताव
पुन्हा भारताची फाळणी होणार?
लोकसंख्येचा असाच असमतोल राहिला, हिंदू अल्पसंख्याक होत राहिला तर येत्या काळात पुन्हा एकदा पाकिस्तान सारखी फाळणी होईल, किंवा बांगलादेशचा सध्याची स्थिती आहे. अशी परिस्थिती भारतात निर्माण होईल, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा महामंत्री गोविंद शेंडे यांनी दिला आहे.
हिंदूची संख्या घटल्याचा दावा
प्रयागराज येथील व्हीएचपीच्या बैठकीत गोविंद शेंडे यांचा सहभाग होता. १९५१ साली देशात हिंदू ८५ टक्के होता, तो आता ७८ टक्के आहे, असा दावा करण्यात आला आहे. हिंदूची संख्या वर्षागणिक कमी होत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हिंदू तरुणांनी व्यसनाधीनता सोडावी, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू नये, तीन अपत्यांना जन्म द्यावा, असे आवाहन शेंडे यांनी केले.