
Group Captain Shubhanshu Shukla awarded Ashok Chakra: ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर (ISS) त्यांच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमेत असाधारण कामगिरी बजावल्याबद्दल शांतताकाळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र जाहीर झाला आहे. त्यांना लवकरच अशोच चक्र देऊन सन्मानित करण्यात येईल. त्यांनी अंतराळ मोहिमेत कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना केला होता. त्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हातळली होती. त्यांच्यावरील जबाबदारी त्यांनी चोख बजावली होती. त्यांनी भारताचे नाव जागतिक मंचावर उंचावले. या कामगिरीबद्दल त्यांच्या नावाची अशोक चक्रासाठी शिफारस करण्यात आली होती.
शुभांशु शुक्ला हे तीन सहकाऱ्यांसह एक्सिओम-4 मिशन (Axiom-4 Mission) अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) साठी पोहचले होते. त्यांनी 25 जून 2025 रोजी या मोहिमेसाठी उड्डाण घेतले होते. विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या नंतर शुभांशु शुक्ला हे दुसरे अंतराळ प्रवाशी ठरले आहेत. शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात मोठा कालावधी व्यतीत केला. ते 14 जुलै रोजी पृथ्वीवर परतले. त्यांनी अंतराळात जवळपास 20 दिवस वास्तव्य केले. अंतराळ मोहिमेदरम्यान त्यांनी 60 हून अधिक प्रयोग केले. यामध्ये जैवसंशोधन विज्ञान, न्यूरोसायन्स, अवकाश तंत्रज्ञान, प्रगत साहित्य विज्ञान क्षेत्रात त्यांनी हे प्रयोग केले. त्याची विशेष दखल घेतली गेली.
अनेक अडथळे, तरीही धैर्याने सामना
या अंतराळ मोहिमेत शुभांशु यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अंतराळातील आव्हानांचात त्यांनी धैर्याने सामना केला. मानवी शरीरावर होणारे विविध आणि विचित्र परिणाम, या स्टेशनवरील मायक्रोग्रॅव्हिटी, मानव शरीर विज्ञान आणि प्रगत साहित्याशी संबंधित किचकट प्रयोग त्यांनी या कालावधीत अंतराळ स्टेशनवर केले. या काळात अनेक अडचणी आल्या. पृथ्वीपासून दूर आणि अनेक आव्हानं समोर असतानाही त्यांनी या काळातील प्रयोग थांबवले नाही. ते या काळात शांत आणि दृढनिश्चियी दिसले. त्याचे मोठे कौतुक जागतिक पातळीवर करण्यात आले.
इतकी प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी शांततेने सर्व प्रयोग केले. या काळात डोकेदुखीच नाही तर क्रॅम्प येणे, अस्वस्थ वाटणे, आरोग्याचे अनेक त्रास, मानसिक दडपण, थकवा यावर त्यांनी मात करून विविध प्रयोग केले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत आता त्यांना भारत सरकार शौर्य पुरस्कार अशोक चक्र देऊन सन्मानित करणार आहे.