SDM Oshin Sharma : प्रसिद्ध महिला सरकारी अधिकाऱ्याचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ!
एका महिला अधिकाऱ्याचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे फेसबुकवर फेक अकाऊंट चालू करून हे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत.

SDM Oshin Sharma Viral Photo : सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) दुनियेत कधी काय होईल हे सागता येत नाही. कधी एखाद्या व्यक्तीचा आक्षेपार्ह फोटो एका क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होईल याचा आता काही नेम नाही. एआयच्या मदतीने अवघ्या काही सेकंदांत एखाद्या व्यक्तीचे प्रतिमाहनन करता येऊ शकते. एआयचा चांगला वापर केला तर हे तंत्र वरदान ठरू शकते. परंतु याच तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास काय घडू शकतं, याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एआयच्या मदतीने हिमाचल प्रदेशमधील एका प्रसिद्ध प्रशासकीय महिला अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. हे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत गेले असून पोलीस आक्षेपार्ह फोटो व्हायरल करणाऱ्याचा शोध घेत आहेत. परंतु प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यासोबत ही घटना घडल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशमधील शिमला (शहरी) भागाच्या एसडीएम म्हणजेच उपविभागीय दंडाधिकारी ओशिन शर्मा यांचा एक आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर केला जातोय. विशेष म्हणजे हा फोटो खरा नसून तो एआयच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. हा फोटो व्हायरल करताना फेसबुकवर एक फेक खाते सुरू करण्यात आले. याच खात्यावरून ओशिन शर्मा यांचे काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आले. हा प्रकार समजताच ओशिन शर्मा यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
ओशिन शर्मा यांचे लाखोंनी फॉलोअर्स
ओशिन शर्मा यांच्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत. शुक्रवारी (7 नोव्हेंबर) रात्री ओशिन शर्मा यांचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट करण्यात आले. ओशिन शर्मा यांचे इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर लाखोंनी फॉलोअर्स आहेत. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर येताच तो व्हायरल झाला.
View this post on Instagram
कोण आहेत ओशीन शर्मा?
दरम्यान, पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दाखल घेतली आहे. पोलिसांनी कसून तपास चालू केला असून लवकरच आम्ही आरोपीला बेड्या ठोकू, असे आश्वासन दिले आहे. ओशिन शर्मा या हिमाचल प्रदेशातील प्रशासकीय सेवेत असलेल्या प्रसिद्ध महिला अधिकारी आहेत. सोशल मीडियावर त्या चांगल्याच प्रसिद्ध आहेत. महिला सशक्तिकरण, शिक्षण, स्पार्धा परीक्षा याविषयी त्या सोशल मीडियावर माहिती देतात. त्या लाडली फाऊंडेशनच्या ब्रँड अॅम्बेसिडर आहेत.
