
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे गोंधळून गेलेल्या पाकिस्तानने बुधवारी आणि गुरुवारी रात्री जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरातमधील सीमेलगतच्या भागांतील भारतीय लष्कराच्या आस्थापनांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या मजबूत हवाई यंत्रणांनी तो पूर्णपणे हाणून पाडला. उलट प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने केलेल्या कारवाईत लाहोरमधील हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट झाल्याचं वृत्त समोर आलं. त्याचप्रमाणे पाकिस्तानची दोन लढाऊ विमानंही उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय. ‘लाहोर इथली हवाई सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय करण्यात आल्याचं विश्वसनीयरित्या कळलंय’, असं भारतीय लष्कराने स्पष्ट केलं. आधुनिक काळातील युद्धात आकाशावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं, हे यावरून समजतंय. त्यामुळे कोणत्याही राष्ट्राच्या संरक्षणात्मक पायाभूत सुविधांमध्ये हवाई सुरक्षा प्रणाली (Air Defence System) ही एक महत्त्वाची सुविधा असते. भारताच्या सक्षम आणि गतिमान हवाई सुरक्षा प्रणालीमुळेच बुधवारी आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानचे हवाई हल्ले अयशस्वी ठरले. एअर डिफेन्स सिस्टिम कशी काम करते? हवाई सुरक्षा यंत्रणेचं प्राथमिक उद्दिष्ट हे आकाशातील धोक्यांना आणि हल्ल्यांना उधळून लावणं...