मोठी घोषणा ! भारतातील या रस्त्याला मिळणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव

Donald Trump Avenue : देशातील एका रस्त्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याला अद्याप केंद्र सरकारची मंजूरी मिळालेली नाही.

मोठी घोषणा ! भारतातील या रस्त्याला मिळणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव
Donald Trump Road
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 07, 2025 | 10:39 PM

भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही काळापासून ताणलेले आहेत. अलिकडेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत. यामुळे अमेरिकेला मिरची लागली आहे. अशातच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव दिले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हैदराबादमधील एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू असे नाव देण्याचा निर्णय तेलंगणातील काँग्रेस सरकारने घेतला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. अशातच आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ट्रम्प यांच्या सन्मानार्थ हैदराबादमधील एका व्हीआयपी रस्त्याचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. हैदराबादमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शेजारील रस्त्याचे नाव आता ‘डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू’ असे ठेवले जाणार आहे असं तेलंगणा सरकारने म्हटलं आहे.

ट्रम्प यांच्या नावाचा प्रस्ताव परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवला जाणार

मनी कंट्रोलने सादर केलेल्या एका अहवालानुसार, नानकरामगुडा या आर्थिक जिल्ह्यात हा रस्ता आहे. या रस्त्याला पूर्वी विशेष असे नाव नव्हते. मात्र आता त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ठेवले जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आता राज्य सरकार केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि अमेरिकन दूतावासाला याबाबत माहिती देणार आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिल्लीत झालेल्या यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) मध्ये हे संकेत दिले होते. आता सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने प्रस्ताव नाकारल्यास काय होणार?

तेलंगणा सरकार आगामी काळात याबाबतचा प्रस्ताव परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवणार आहे, मात्र आता हा प्रस्ताव परराष्ट्र मंत्रालय मंजूर करणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण भारतातील रस्त्यांची नावे क्वचितच जिवंत परदेशी नेत्यांच्या नावावर ठेवली जातात. केंद्र सरकारने हा प्रस्ताव नाकारल्यास रेवंत रेड्डी हे तेलंगणाच्या विकासाविरुद्धचे पाऊल म्हणून वर्णन करू शकतात. मात्र केंद्र सरकारने याला मान्यता दिल्यास दोन्ही देशांमधील संबंधांसाठी हा सकारात्मक संकेत असेल.