IPS पतीची ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या, आता IAS मधू राणी मुख्यमंत्र्यांच्या सचिव, पतीच्या हत्येनंतर 11 दिवसांत बनल्या होत्या आई
IAS Madhu Rani Teotia: आयपीएस नरेंद्र सिंह खाण माफियांवर कारवाई करण्यासाठी पोहोचले. त्यांनी खाण माफियांचे ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

IAS Madhu Rani Teotia: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सचिव म्हणून मधू राणी यांची नियुक्ती केली गेली आहे. 2008 बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या मधू राणी तेवतिया यांच्या नियुक्तीचे आदेश उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी काढले आहे. दिल्लीत मुख्यमंत्र्याचा पदभार घेतल्यानंतर रेखा गुप्ता यांनी प्रशासनात अनेक बदल केले आहे.
2008 कॅडरच्या आयएएस मधू राणी तेवतिया याचे पती नरेंद्र कुमार सिंह आयपीएस होते. मध्य प्रदेशातील मुरैना येथे खाण माफियांनी 8 मार्च 2012 रोजी ट्रॅक्टर खाली चिरडून त्यांची हत्या केली होती. याआधी त्याही पतीसह मध्य प्रदेश केडरमध्ये कार्यरत होत्या. पतीच्या निधनानंतर त्यांच्या केडरमध्ये बदल करण्यात आला. स्पेशल केस म्हणून त्यांचे केडर बदलून AGMUT केडर दिले गेले. दरम्यान नरेंद्र कुमार सिंह यांचा हत्येचा तपास सीबीआयकडे दिला गेला होता. सीबीआयने हे प्रकरण अपघात असल्याचे दाखवले. या प्रकरणातील चालकास दहा वर्षांची शिक्षा झाली होती.
काय घडले होते…
नरेंद्र कुमार सिंह हे मुरैना येथे कार्यरत होते. त्यांची पत्नी मधू राणी ग्वालियरमध्ये होती. 8 मार्च 2012 रोजी होळी होती. नरेंद्र कुमार सिंह यांचे आजोबा त्यांना भेटण्यासाठी आले. सर्वच परिवार आनंदात होता. मुरैना येथील अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी पोलीस सातत्याने कडक कारवाई केली जात होती. अवैध उत्खनन करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी आयपीएस नरेंद्र सिंह खाण माफियांवर कारवाई करण्यासाठी पोहोचले. त्यांनी खाण माफियांचे ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
11 दिवसांनी दिला बाळाला जन्म
पतीची हत्या झाली तेव्हा मधू राणी या मॅटरनेटी लिव्हवर (मातृत्वाची रजा) होत्या. घटनेच्या 11 दिवसांनंतर त्यांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. मधू राणी तेवतिया यांनी दिल्ली विद्यापीठातून डॉक्टर ऑफ होमिओपॅथीची पदवी देखील घेतली आहे. याशिवाय त्यांनी आयआयटी मद्रासमधून एक्झिक्युटिव्ह मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनची पदवी मिळवली आहे.
