
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष चांगलाच शिगेला पोहोचला आहे, अमेरिकेनं मीडल इस्टमध्ये आपल्या दोन युद्ध नौका तैनात कल्या आहेत. सोबतच शेकडो फायटर जेट देखील अमेरिकेकडून पाठवण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून वारंवार इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. इराणवर मर्यादित सैन्य करावाई करून त्यांच्यावर अणु करार करण्यासाठी दबाव आणायचा असा विचार डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. मात्र दुसरीकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. मध्य पूर्वेतील अनेक देश युद्धाच्या तडाख्यात सापडू शकतात, तसंच अमेरिकेनं जर इराणवर हल्ला केला तर सध्या अमेरिकेचं इराणसोबत अणु करारावर बोलणं सुरू आहे, तो देखील पर्याय कायमचा बंद होऊ शकतो.
इराणच्या एका उच्चपदस्त अधिकाऱ्याच्या हवाल्यानं समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार जर अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर अमेरिका आणि इरामधील चर्चेचे सर्व दरवाजे बंद होऊ शकतात. तसंच इराण देखील अमेरिकेवर हल्ला करू शकतो. यामध्ये अमेरिकेचं देखील मोठं नुकसान होऊ शकतं. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आता दहा ते बारा दिवसांचा वेळ दिला आहे. तुमच्याकडे दहा दिवसांचा वेळ आहे, तोपर्यंत तुम्ही निर्णय नाही घेतला तर इराणमध्ये भयंकर वाईट गोष्टी घडतील अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे इराण देखील मागे घेण्यास तयार नाहीये, इराणने ओमानच्या खाडीत रशियासोबत युद्ध सराव सुरू केला आहे.
दरम्यान जर अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालं तर त्याचा मोठा परिणाम हा भारतावर देखील होऊ शकतो. भारतामध्ये मोठा ऊर्जा संकट निर्माण होऊ शकतं, कारण जर अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालं तर मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण होईल, इराणने यापूर्वी देखील स्पष्ट केलं आहे, की आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा मार्ग असलेली होर्मुझची खाडी बंद करू, तसं झालं तर भारतासह जगावर मोठं संकट निर्माण होऊ शकतं, एवढंच नाही तर भारत ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणात आखाती देशांवर अवलंबून आहे, त्यामध्ये देखील विस्कळीतपणा येऊ शकतो.