
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, मात्र त्यानंतर त्यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला, अमेरिकेमध्ये सध्या भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. याचा मोठा फटका हा भारताला बसत असल्याचं आता समोर आलं आहे.
मोठी बातमी समोर आली आहे, अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर भारतीय रुपयाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली असून, तो डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीला पोहोचला आहे. भारत ही आशियामधील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, मात्र सध्या तरी टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. आज रुपयाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे, रुपया प्रति डॉलर 88.44 रुपयांवर पोहोचला आहे. जो गेल्या शुक्रवारी 88.36 रुपये प्रति डॉलवर होता.
दरम्यान टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सरकारकडून आता आवश्यक ती पाउलं उचलली जात आहेत. केंद्र सराकारने जीएसटीचे दोन स्लॅब कमी केले आहेत. पूर्वी 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे चार स्लॅब होते, त्यापैकी आता दोन स्लॅब 12 टक्के आणि 28 टक्के कमी करण्यात आले आहेत. आता फक्त 18 टक्के आणि पाच टक्के हे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार असून, देशांतर्गत मागणी वाढल्यास त्याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसू शकतो. त्याचा फयदा हा रुपयाच्या बळकटीकरणासाठी होईल, तर दुसरीकडे आरबीआयकडून देखील रुपयांची घसरण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एकीकडे टॅरिफनंतर भारताचे अमेरिकेसोबत संबंध बिघडले आहेत, तर दुसरीकडे मात्र चीन आणि रशियासोबत भारताची जवळीक वाढताना दिसत आहे. आमच्या बाजारपेठा या भारतीय वस्तूंसाठी खुल्या असतील, आम्ही भारतीय वस्तूंचं स्वागत करू अशी भूमिका या दोनही देशांकडून घेण्यात आली आहे, त्यामुळे आता भारताचा रशिया आणि चीनसोबत व्यापार वाढण्याची शक्यता आहे.