छत्तीसगडमध्ये मतदानाला लागले गालबोट, मोठी चकमक, अनेक नक्षलवादी ठार

सुमारे 20 मिनिटे नक्षलवादी आणि जवान यांच्यात ही चकमक सुरु होती. यानंतर नक्षलवादी पळून गेले. यावेळी जवानांना नक्षलवादी 2 ते 3 मृतदेह घेऊन पळून जाताना दिसले. घटनास्थळावरून डीआरजीने एके ४७ जप्त केली आहे.

छत्तीसगडमध्ये मतदानाला लागले गालबोट, मोठी चकमक, अनेक नक्षलवादी ठार
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Nov 07, 2023 | 5:08 PM

छत्तीसगड | 7 नोव्हेंबर 2023 : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यात मतदान सुरळीत सुरु आहे. अशातच सुकमाच्या ताडमेटला आणि दुलेद येथून मोठी बातमी आली आहे. मतदान प्रक्रिया सुरु असताना येथे नक्षलवाद्यांनी हल्ला केला. मात्र, नक्षलवाद्यांना सीआरपीएफच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले. नक्षलवादी आणि सीआरपीएफचे जवान यांच्या चकमकीत अनेक नक्षलवादी ठार झाल्याची बातमी आहे. तसेच, कांकेर जिल्ह्यातील बांदे पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चकमक झाली.

छत्तीसगडमधील सुकमाच्या ताडमेटला आणि दुलेद दरम्यान सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. सुकमा येथील पडेराच्या दक्षिण भागात मतदान सुरू होते. येथील मीनपा मतदान केंद्राच्या सुरक्षेसाठी येथे सैनिक तैनात करण्यात आले होते. दुपारी एकच्या सुमारास केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी परिसराची टेहाळणी करण्यास निघाले. त्याचवेळी त्यांच्यावर नक्षल वाद्यांनी हल्ला केला.

केंद्रीय राखीव पोलीस दलाने त्यांना चोख उत्तर दिले. सुमारे 20 मिनिटे नक्षलवादी आणि जवान यांच्यात ही चकमक सुरु होती. यानंतर नक्षलवादी पळून गेले. यावेळी जवानांना नक्षलवादी 2 ते 3 मृतदेह घेऊन पळून जाताना दिसले. जवानांना घटनास्थळी रक्ताचे डाग आणि मृतदेह ओढल्याच्या खुणा आढळून आल्या. या चकमकीत काही जवान जखमी झाले आहेत. परंतु, ते सुरक्षित आहेत. जवानांनी जवळच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

त्याचवेळी कांकेर जिल्ह्यातील बांदे पोलीस स्टेशन परिसरात बीएसएफ आणि डीआरजीची टीम परिसर पाहण्यासाठी निघाली. याच दरम्यान नक्षलवाद्यांनी हल्ला केला. डीआरजीने नक्षलवाद्यांना घेरले. सुमारे पाच ते दहा मिनिट ही चकमक सुरु होती. घटनास्थळावरून डीआरजीने एके ४७ जप्त केली आहे. काही नक्षलवादी या चकमकीत जखमी किंवा मृत झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

देशातील पाच राज्यांमध्ये आजपासून विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली. छत्तीसगड आणि मिझोराममध्येही मतदान होत आहे. छत्तीसगडमधील 10 जागांवरील मतदान दुपारी तीन वाजता संपले. तर, 10 जागांसाठी मतदान नंतर सुरू झाले. मिझोराममध्ये एकाच टप्प्यात सर्वचा सर्व 40 जागांवर मतदान होत आहे. छत्तीसगडमध्ये अनेक नक्षलग्रस्त भागात मतदान होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने येथे सुमारे 60 हजार सुरक्षा दल तैनात केले आहे. तर, निवडणुकीसाठी 25,429 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.