बंगाल ‘पराक्रम’मध्ये आज मोदी, आसाममध्ये शाहाही दौऱ्यावर

नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित 'पराक्रम दिवस' या कार्यक्रमात ते भाग घेतील. (west bengal Narendra Modi Parakram Divas)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:07 AM, 23 Jan 2021
बंगाल 'पराक्रम'मध्ये आज मोदी, आसाममध्ये शाहाही दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोलकाता : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राजकीय नेत्यांकडून आपल्या सोईसाठी पक्षबदल, आरोप प्रत्यारोप, टीका-टिप्पणी अशा अनेक गोष्टी पश्चिम बंगलाच्या राजकारणात सुरु आहेत. हे सगळं काही घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (23 जानेवारी) पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘पराक्रम दिवस’ या कार्यक्रमात ते भाग घेतील. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाहासुद्धा आसामच्या 2 दिवसीय दौऱ्यावर असून यावेळी ते वेगवेगळ्या योजनांचे उद्धाटन करतील.

पराक्रम दिवस कार्यक्रमात भाषण करणार

पंतप्रधान नरेंद मोदी सकाळी 11 वाजता आसाममध्ये पोहोचतील. तिथे एका शासकीय कार्यक्रमात भाग भेऊन ते पश्चिम बंगालकडे रवाना होतील. येथे आल्यावर ते पश्चिम बंगालमधील कोलकात्यातील नेताजी भवनाला 3 वाजता भेट देतील. 3.45 वाजता ते नॅशनल लायब्रेरीमध्ये बंगालमधील स्थानिक कलाकारांशी बातचित करतील. भारत सरकारने सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन (23 जानेवारी) हा ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचे यापूर्वी जाहीर केलेले आहे. त्यानिमित्ताने व्हिक्टोरिया मेमोरियल येथे आयोजित ‘पराक्रम दिवस’ या कार्यक्रमात मोदी भाषण करतील. या कार्यक्रमासंबंधी त्यांनी शुक्रवारी ट्विट करुन माहिती दिली होती.

नाणे आणि टपाल तिकीट

यावेळी नरेंद्र मोदी एक प्रदर्शनातही सहभाग घेतील. कोलकात्यात मोदींच्या उपस्थितीत नेताजींच्या आयुष्यावरील एका प्रोजेक्शन मॅपिंग शोचे उद्घाटन केले जाईल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एक विशेष नाणं आणि टपाल तिकिटाचेही अनावरण करण्यात येईल.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर ममता यांनीही आगामी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जातंय.

संबंधित बातम्या :

देशात पुन्हा एकदा भाजप सरकार?, जाणून घ्या मोदी सरकारची आतापर्यंतची कामगिरी?

तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचंय?, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

BREAKING: पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्रीही लस घेणार; केंद्राचा मोठा निर्णय