Godhra Election : राजकारणातली मोठी घटना, गुजरातच्या गोध्रामध्ये 100 टक्के मुस्लिम मतदार असलेल्या भागात हिंदू महिलेचा विजय
Godhra Election : गुजरातमधील गोध्रा शहर हे धार्मिक कारणांसाठी ओळखलं जातं. धार्मिक आधारावर विभाजन ही या शहराची ओळख आहे. पण याच गोध्रामध्ये एक आश्चर्यकारक निवडणूक निकाल लागला आहे. एक हिंदू महिला नगरपालिका निवडणुकीत जिंकली आहे.

गुजरातमधील गोध्रा शहर हे देशभरात धार्मिक कारणांसाठी ओळखलं जातं. आजही ग्रोधाच्या आठवणी अनेकांच्या मनात ताज्या आहेत. याच गोध्रा शहरातून सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी एक मोठी घटना घडली आहे. गुजरातच्या गोध्रा शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. यात गोध्रा नगरपालिकेच्या वॉर्ड नंबर 7 मधून अपेक्षाबेन नैनेशभाई सोनी या अपक्ष हिंदू महिला उमेदवाराने दणदणीत मताधिक्क्याने विजय मिळवला. महत्वाचं म्हणजे अपेक्षाबेन गोध्राच्या ज्या 7 नंबर वॉर्डमधून जिंकल्या, तिथे 100 टक्के मुस्लिम मतदार आहेत.
गोध्रामध्ये 100 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या वॉर्डमध्ये एका हिंदू महिला उमेदवाराचा विजय ही दृष्टीकोन बदलणारी घटना आहे. महत्वाचं म्हणजे त्या वॉर्ड नंबर 7 च्या मतदारही नाहीत, तरीही त्यांनी मुस्लिम मतदारांचा विश्वास संपादन केला. जातीय आणि धार्मिक समीकरणांच्या पलीकडे जाऊन मुस्लिम मतदारांनी निर्णयाक भूमिका बजावल्यामुळे हा विजय शक्य झाला, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. ही गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील एक मोठी घटना आहे.
निरीक्षकांचं म्हणणं काय?
धार्मिक बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याची गोध्राच्या राजकीय इतिहासातील ही दुर्मिळ घटना आहे. मुस्लिम मतदारांनी मोठ्या मताधिक्क्याने एका हिंदू महिला उमेदवाराला निवडून देणं यातून गोध्राच्या मतदारांनी धार्मिक विभागणीऐवजी व्यक्तीच्या कार्यक्षमतेला प्राधान्य देत असल्याचं दाखवून दिलं आहे. या ग्रोधा मॉडलची भविष्यात ग्रामीण भागात आणि अन्य गुजरातच्या नगरपालिकांमध्ये पुनरावृत्ती होईल असं निरीक्षकांचं म्हणणं आहे.
भाजपने किती महापालिका जिंकल्या?
गुजरातच्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचं एकहाती वर्चस्व दिसून आलं. भाजपने 15 महानगरपालिका जिंकल्या. एकट्या अहमदाबादमध्ये 192 पैकी 146 जागा जिंकल्या. काँग्रेसला फक्त 18 जागांवर समाधान मानावं लागलं. सूरतमध्ये भाजपने 115 जागा जिंकल्या. आम आदमी पार्टीला फक्त चार जागा मिळाल्या. राजकोट, वडोदरा या शहरांमध्ये सुद्धा हाच पॅटर्न पहायला मिळाला. त्या प्रत्येक महापालिका क्षेत्रात भाजपने 65 जागा जिंकल्या. काँग्रेसच्या दुहेरी आकडा गाठताना नाकीनऊ आले. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मागच्या अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे.
