एक तास बैठक, 11 पक्षांची हजेरी, अवघ्या 15 मिनिटात खरगेंनी काय सांगितलं?
डीलिमिटेशन बिलाला इंडिया आघाडीचा तीव्र विरोध आहे. खरगे म्हणतात, हे बिल लोकशाहीसाठी घातक असून भाजपला कायमस्वरूपी सत्ता हवी आहे. चीनप्रमाणे भारतातही सत्ता केंद्रीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एससी/एसटीच्या हिताकडे दुर्लक्ष आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीने एकत्र येत रणनिती आखली.

डीलिमिटेशन बिलावर इंडिया आघाडीने टीका केली आहे. काही लोकांना या बिलाचा धोका कळत नाहीये. 850 जागा आल्या तर लोकशाही संपुष्टात येईल. त्यांना सत्ता आपल्या हातात आणण्यासाठी डीलिमिटेशन बिल हत्यार म्हणून वापरणार आहे. म्हणूनच आम्ही त्याला विरोध करत आहोत. चीनमध्ये जे घडलं तेच भारतात करायचं आहे. हात उंचावून मॅजॉरिटी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायमस्वरुपी सत्ता हातात घेण्याचा आणि मनुस्मृती आणण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
डीलिमिटिेशन बिलाबाबत रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला 11 पक्षाचे नेते उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थति नव्हते. तर आम आदमी पार्टी, डीएमके आणि बिजू जनता दल या आमंत्रित पक्षांनीही बैठकीकडे पाठ फिरवली होती. तब्बल तासभर ही बैठक चालली. त्यानंतर इंडिया ब्लॉकची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अवघ्या 15 मिनिटात आघाडीची भूमिका स्पष्ट केली.
हे लोकशाहीला घातक
मोदी सरकार जे डीलिमिटेशन बिल आणत आहे, ते लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाहीला संपुष्टात आणून पूर्ण सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी त्यांनी 850 सदस्य संख्या करण्याचा निर्णय घेतला आहे. कायमस्वरुपी सत्ता आपल्या हातात त्यांना घ्यायची आहे, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
एससी, एसटीच्या हिताचं काहीच नाही
तसेच यात एससी, एसटीच्या हिताकडे यात लक्ष देण्यात आलं नाही. हा त्यांच्यावर अन्याय झाला आहे. संविधानाच्या मते, राज्यातील लोकसंख्यच्या प्रमाणात अनुसूचित जाती आणि जनजातीच्या जागा वाढल्या पाहिजे. पण या विधेयकात त्यात काही तरतूद नाही. 2026 ची जनगणना येणार आहे. त्याबाबतही सरकारकडून काही सांगितलं जात नाहीये. पण लेटेस्ट जनगणना जाहीर केल्यावर एससी, एसटीची लोकसंख्या वाढल्याने त्यांना अधिक जागा मिळेल. पण त्यांना एससी, एसटीला त्यांचा शेअर द्यायचा नाही. त्यामुळे त्यांना आपल्या मनाप्रमाणेच काम करायचं आहे, असंही खरगे म्हणाले.
राखीव जनरल होईल, जनरल राखीव होईल
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आरोप आहे. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलं आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात सर्व काही होणार आहे. त्यामुळे ते मनाप्रमाणे आणि सोयीप्रमाणे मतदारसंघाची पुनर्रचना करतील. त्यामुळे अशा व्यक्तीच्या हातात मतदारसंघाची पुनर्रचना देणं योग्य नाही. आसाममध्ये त्यांनी जे काय केलं हे समोर आहे. जनरल सीट फेव्हर नसेल तर राखीव करतील आणि राखीव सीटला ते जनरल कॅटेगिरीत टाकू शकतात. म्हणजे सर्व सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी ते मजबुतीने काम करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
