
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लावला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध गेल्या काही काळापासून बिघडलेले आहेत. मात्र अशातच आता दोन्ही देशांमध्ये लवकरच एक महत्वाचा करार होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात, एक उच्चस्तरीय अमेरिकन शिष्टमंडळ भारतात येणार आहे. या शिष्टमंडळमध्ये अमेरिकन संरक्षण विभागाचे अधिकारी आणि बोईंग कंपनीचे प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.
हे अमेरिकन शिष्टमंडळ भारतीय अधिकाऱ्यांसोबत सुमारे $4 अब्ज किमतीच्या संरक्षण कराराबाबत चर्चा करणार आहे. दोन्ही देशांमध्ये हा करार झाला तर भारताला 6 नवीन P-8I नौदल विमाने मिळणार आहे. हा करार काही महिन्यांपासून लांबणीवर पडला होता, मात्र आता दोन्ही देश या कराराबाबत चर्चा करण्यास तयार आहे, त्यामुळे दोन्ही देशांकडून यावर लवकरच स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
ब्लूमबर्गने या कराराबाबत एक अहवाल सादर केला आहे. यानुसार दोन्ही देशांमधील या कराराबाबतची चर्चा दोन्ही देशांसाठी महत्वाची असणार आहे. कारण भारतावर अमेरिकेने कर लादल्यामुळे भारताची अमेरिकेला होणारी निर्यात थांबली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापार कराराबाबत चर्चा सुरू आहे असं विधान केलं होतं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमेरिका हा देश भारताता जवळचा मित्र आणि नैसर्गिक व्यापारी भागीदार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये विमानांबाबत करार झाला तर हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
दोन्ही देशांमध्ये P-8I विमानांबाबत करार होणार आहे. हे विमान अमेरिकन कंपनी बोईंगने बनवलेले आहे. याचा वापर गस्त घालण्यासाठी सागरी ऑपरेशन्ससाठी करता येतो. हे विमान पाणबुड्या शोधण्यास, शत्रूच्या जहाजांचे ठिकाण शोधण्यासाठी सक्षम आहे. यामुळे सागरी सुरक्षेला बळकटी मिळते.
भारताने 2009 मध्ये अमेरिकेकडून 8 P-8I विमाने खरेदी केली होती. ज्याची किंमत 2.2 अब्ज डॉलर्स होती. 2019 मध्ये आणखी 4 विमाने खरेदी करण्यात आली होती. सध्या ही सर्व विमाने तामिळनाडूमधील राजाली नौदल तळावर तैनात आहेत. ही विमाने हिंदी महासागर सतत गस्त घालत असतात. P-8I ही विमाने केवळ देखरेख नव्हे तर, गरज पडल्यास हल्ला करू शकतात. या विमानांमुळे समुद्री मार्गातून भारतासाठी असणारा धोका कमी होत आहे.