
भारत-पाकिस्तान सीजफायर आणि टॅरिफ वॉर नंतर नवी दिल्ली- वॉशिंग्टनमध्ये अंतर वाढत चाललं आहे. आतापर्यंत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याबद्दल बरीच वक्तव्य केली आहेत. मागच्याच आठवड्यात त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला. आता अमेरिकेसोबतच्या संबंधांवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर मोकळेपणाने बोलले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बोलले की, “ऑपरेशन सिंदूरवेळी अमेरिकसोबत चर्चा झाली होती. त्या सोबतच अन्य देशांसोबतही चर्चा झालेली. युद्ध काळात अन्य देशांबरोबर जसं बोलणं होतं, तसं ते अमेरिकेसोबतही झालं”
“अमेरिकेसोबत आम्ही बऱ्याच पर्यायांवर चर्चा करत आहोत. आतापर्यंत असा एकही अमेरिकी राष्ट्रपती नव्हता, ज्याने विद्यमान राष्ट्राध्यक्षांइतक परराष्ट्र धोरण सार्वजनिक रित्या मांडलं असेल. हा एक बदल आहे, त्याचे परिणाम फक्त भारतापुरतेच मर्यादीत नाहीत, तर जगातील अन्य देश, ट्रम्प यांची स्वत:च्या देशात सुद्धा व्यवहार करण्याची पद्धत वेगळी आहे” असं जयशंकर म्हणाले.
कोणीही असं म्हटलेलं नाही, की चर्चा बंद झालीय
“भारत-अमेरिकेमध्ये ट्रेड डीलवर चर्चा अजूनही सुरु आहे. पण मूळ विषय हा आहे की, आमच्यासमोर काही रेड लाईन्स आहेत. चर्चा अशा स्तरावर आहे की, कोणीही असं म्हटलेलं नाही, की चर्चा बंद झालीय. लोक परस्परांसोबत बोलतात” असं जयशंकर म्हणाले.
भारतासमोरची रेड लाइन काय?
रेड लाइनबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, “रेड लाइन आमचे शेतकरी आणि काही प्रमाणात आमच्या उत्पादकाच्या हिताची आहेत. आम्ही एक सरकार म्हणून आमचे शेतकरी आणि छोट्या उत्पादकांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही त्यावर ठाम आहोत”
आम्हाला आमची ताकद माहित आहे
पाकिस्तान-अमेरिका संबंधांवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “त्यांच्यात मैत्रीचा इतिहास आहे. पाकिस्तान आपल्या सोयीनुसार राजकारण करतो. आम्हाला आमची ताकद आणि आमची नाती माहित आहेत. ऑपरेशन सिंदूरवेळी अमेरिकेसह अनेक देशांचे फोन आले होते. आंतरराष्ट्रीय संबंधात असच होतं”
अमेरिकेला पण तशीच किंमत चुकवावी लागेल
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारतावर 25 टक्के टॅरिफ अमेरिकन धोरणाचा भाग म्हणून लावलाय तर उर्वरित 25 टक्के टॅरिफ रशियाकडून तेल खरेदीसाठी लावलाय. ट्रम्प यांच्या या निर्णयांबद्दल भारतीयांच्या मनात संतापाची भावना आहे. पण भारताने अजूनपर्यंत संयम बाळगला आहे. अमेरिकेसारखे उत्तराला प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतलेली नाही. भारताने उद्या एखादा निर्णय घेतला, तर अमेरिकेला सुद्धा त्याची तशीच किंमत चुकवावी लागेल.