भारत-पाक सीमेवर काल रात्रीपासून आतापर्यंत काय काय घडलं? परराष्ट्र मंत्रालयाने दिली प्रत्येक अपडेट

भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवर तणाव वाढला असून, पाकिस्तानी सैन्याने अनेक ड्रोन वापरून भारतावर हल्ले केले आहेत. भारतीय सैन्याने या ड्रोनला पाडून प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने सीमा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न केला असून, मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला आहे.

भारत-पाक सीमेवर काल रात्रीपासून आतापर्यंत काय काय घडलं? परराष्ट्र मंत्रालयाने दिली प्रत्येक अपडेट
india pak war
| Updated on: May 09, 2025 | 6:20 PM

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने ड्रोन हल्ले केले जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानने अनेक ड्रोन भारतात पाठवत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत त्यांचे ड्रोन पाडले. यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत काल रात्रीपासून आतापर्यंत काय काय घडलं याची सविस्तर माहिती दिली.

“पाकिस्तानी सैन्याने ८ आणि ९ मेच्या रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानकडून सीमा परिसरात जोरदार गोळीबार करण्यात आला. तसेच घुसखोरीही करण्यात आली. यावर भारताने चोख प्रत्युत्तर दिले. यासोबत भारतीय सैन्याने पाकिस्तानचे ड्रोनही पाडले. या ड्रोनचा उद्देश गुप्त माहिती गोळा करणे हा होता. हे ड्रोन तुर्कीमध्ये बनलेले होते. पाकिस्तानने पुंछ, मेंढर यांसारख्या अनेक सेक्टरमध्ये ड्रोन पाठण्यात आले. तसेच गोळीबारही करण्यात आला. यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानवर हल्ला केला. यात पाकिस्तानचे नुकसान झाले”, अशी माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली.

सुमारे ३०० ते ४०० ड्रोनचा वापर

“पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी तुर्की बनावटीच्या ड्रोनचा वापर केल होता. तसेच पाकिस्तानकडून सीमेवरून ३६ ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. पण भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर मोठ्या कॅलिबरच्या शस्त्रांनी गोळीबार केला. यावेळी पाकिस्तानकडून सुमारे ३०० ते ४०० ड्रोन वापरण्यात आले. भारतीय सशस्त्र दलांनी अनेक ड्रोन पाडले”, असे कर्नल सोफिया कुरैशी म्हणाल्या.

भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन

“पाकिस्तानकडून भारतीय लष्कर ठिकाणं आणि नागरी वस्तीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताच्या ३६ ठिकाणांवर पाककडून ४०० ड्रोनच्या माध्यमातून रेकी करण्याचा पाकचा प्रयत्न होता. पंजाबमधील भठिंडा एअरबेसला निशाणा बनवण्यात आले. या ड्रोनची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीची माहिती मिळवणे आणि गुप्तचर विभागाकडून माहिती गोळा करणे हा पाकिस्तानचा उद्देश होता. पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी हल्ल्यात भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. तसेच पाकिस्तानचे नुकसान झाले आहे”, असे कर्नल सोफिया कुरैशी यांनी म्हटले.