
India Pakistan War: पहलगाम हल्ल्यानंतर भारताना ‘ऑपरेशन सिंदूर राबवलं’ पाकिस्तानचा बदला घेतला. पण दशहतवाद्यांच्या मृत्यूनंतर बिधरलेल्या पाकिस्तानने कुरघोड्या करण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. पाकिस्तान आता भारताच्या सीमावर्ती भागांना लक्ष्य करत हल्ले करत आहे. पण भारताकडून पाकिस्तानचे सर्व प्रयत्न मोडून काढले जात आहे. देशात सध्या तणावग्रस्त वातावरण असताना भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
भारत सरकारने 15 मे सकाळी 5:29 वाजेपर्यंत उत्तर आणि पश्चिम भारतातील 32 विमानतळांवर नागरी उड्डाणे स्थगित केली आहेत. यापूर्वी, सरकारने पाकिस्तानी सीमेवर आणि आजूबाजूला असलेली 25 विमानतळे शनिवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. तर जाणून घ्या कोण-कोणते विमानतळं 15 मेपर्यंत बंद राहतील.
सरकारच्या निर्णयानंतर उत्तर भारतातील श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, चंदीगड, धर्मशाला, सिमला, पटियाला, लुधियाना, पठाणकोट, अंबाला, भटिंडा आणि पश्चिम भारतातील जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, उत्तरलाई, किशनगड, राजकोट, जामनगर, भुज, कांडला, मुंद्रा, पोरबंदर विमानतळं बंद राहतील. शिवाय गाझियाबादमधील हिंडन विमानतळ बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशात दररोज 400 हून अधिक उड्डाणे रद्द केली जात आहेत. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, 165 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एवढंच नाही तर, एअर इंडिया, स्पाइसजेट, विस्तारा यासह सर्व विमान कंपन्या उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना परतफेड करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 5 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) एकूण 138 उड्डाणे रद्द करण्यात आली. दिल्लीचे आयजीआय विमानतळ सध्या उत्तर भारतातील एकमेव प्रमुख विमानतळ आहे जे कार्यरत आहे. डेहराडून, लखनऊ आणि जयपूर सारख्या जवळच्या काही शहरांचे विमानतळ सध्या सुरु आहेत.