India Pakistan: काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजर, आज अधिकाऱ्याचा मृत्यू, काश्मीरमधील भीषण वास्तव

India Pakistan War: काल मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित राहिलेल्या सरकारी अधिकाऱ्याची आज मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, काश्मीरमधील भीषण वास्तव, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चकमक सुरु...

India Pakistan: काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजर, आज अधिकाऱ्याचा मृत्यू, काश्मीरमधील भीषण वास्तव
ऑपरेश सिंदूर
| Updated on: May 10, 2025 | 4:23 PM

India Pakistan War: जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संतापलेल्या भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं आणि अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामुळे बिथरलेला पाकिस्तान सतत सीमा भागांवर गोळीबार आणि हल्ले करताना दिसत आहे. पण भारतीय सैन्याने पाकिस्तानचे अनेक प्रयत्न मोडून काढले आहे. दरम्यान पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात जम्मू काश्मीर येथील एका सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. याची माहिती खुद्द उमर अब्दुल्ला यांनी दिली आहे.

उमर अब्दुल्ला यांनी एक ट्विट करत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. ‘राजौरीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. आपण जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला. कालपर्यंत ते उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्याचा दौरा करत होते आणि मी आयोजित केलेल्या ऑनलाइन बैठकीलाही उपस्थित होते.’

 

 

‘आज त्यांच्या निवासस्थानावर पाकिस्तानकडून गोळीबार झाला, ज्यामध्ये आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थप्पा शहीद झाले. या दुःखद नुकसानाबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.’ असं ट्विट उमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5.30 वाजता जेव्हा पाकिस्तानने गोळीबार केला तेव्हा राजकुमार थप्पा त्यांच्या घरात होते. गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर ते घराबाहेर आले. त्यानंतर पाकिस्तानकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

पाकिस्तान एवढ्यावरच थांबला नाही, राजकुमार थप्पा यांच्यावर गोळीबार केल्यानंतर शत्रूने त्यांच्या खोलीवर देखील निशाणा साधला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात अन्य दोन जणांनी देखील आपले प्राण गमावले आहेत. त्यामध्ये एक मुलगा आणि एक महिला देखील सामिल आहे.

शुक्रवारी संध्याकाळी कश्मीरत्या बारामुला पासून गुजरातच्या भूजपर्यंत अंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर 26 ठिकाणी ड्रोन दिसले, ज्यांना भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. जम्मू काश्मीर येथे बारामुली, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा आणि जम्मू येथे पाकिस्तानकडून येणार ड्रोन निष्क्रिय करण्यात भारतीय सैन्याला यश मिळत आहे.