
भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही काळापासून ताणले गेलेले आहेत. अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादल्याने दोन्ही देशांमधील व्यापारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील व्यापार करारावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अशातच आता या व्यापार कराराच्या वाटाघाटीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांमधील बोलणी आता सकारात्मक दिशेने सुरु आहेत. त्यामुळे आगामी काळात लवकरच दोन्ही देशांमध्ये व्यापार करार होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही देशांमधील रखडलेला व्यापार करार पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार करारबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी कराराच्या बाबतील अनेक प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी आपले विचार आणि अटी मांडल्या. शेवटी दोन्ही देशांच्या हितांचे संतुलन राखून व्यापार करार केला जाईल यावर सहमती झाली. भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी तीन दिवसांचा अमेरिकेचा दौरा केला. दौऱ्यावरून परत आल्यानंतर त्यांनी ‘या भेटीमुळे द्विपक्षीय व्यापार संबंध मजबूत झाले असून आगामी काळात पुढील चर्चा होणार आहे’ अशी माहिती दिली.
पीयूष गोयल यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात यूएसटीआर (यूएस व्यापार प्रतिनिधी) जेमिसन ग्रीर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध व्यापारी मुद्द्यांवर खुली चर्चा केली. तसेच गोयल यांनी या दौऱ्यात भारतातील गुंतवणूक वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारी मजबूत करण्यासाठी अनेक अमेरिकन कंपन्यांमधील प्रमुख अधिकारी आणि गुंतवणूकदारांची भेट घेतली असल्याचेही समोर आले आहे.
दोन्ही देशांसाठी हा व्यापार करार फायदेशीर आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी व्यापार कराराबाबत लवकरात लवकर पुढच्या फेरीची चर्चा आयोजित करण्याची गरज व्यक्त केली आहे. जितक्या लवकर व्यापार करार होईल, तितक्या लवकर व्यापार पूर्वपदावर येणार आहे. तसेच या व्यापार कराराचा फायदा दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांनाही होणार आहे.