Breaking: जगाचं लक्ष वेधणारी बातमी, भारत-अमेरिकेच्या टॅरिफ बैठकीत काय घडलं?

आज भारत आणि अमेरिका यांच्यातील अधिकाऱ्यांमध्ये व्यापार कराराबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. दोन्ही देशांनी हा करार लवकरात लवकर करण्यासाठी सहमती दर्शवली आहे.

Breaking: जगाचं लक्ष वेधणारी बातमी, भारत-अमेरिकेच्या टॅरिफ बैठकीत काय घडलं?
Trade Deal
| Updated on: Sep 16, 2025 | 11:32 PM

अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार करार झाल्यास हा कर पूर्णपणे हटण्याची किंवा कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. आज भारत आणि अमेरिका यांच्यातील अधिकाऱ्यांमध्ये या कराराबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. दोन्ही देशांनी हा करार लवकरात लवकर करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. तसेच आजच्या बैठकीत या कराराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

दोन्ही देशांमधील व्यापार करारासाठी अमेरिकेचे मुख्य वाटाघाटीकार ब्रेंडन लिंच हे भारतात आले आहेत. लिंच यांनी आज दिवसभर वाणिज्य विभागाचे विशेष सचिव राजेश अग्रवाल यांच्याशी व्यापार कराराबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर वाणिज्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये आगामी काळात दोन्ही देश व्हर्च्युअल पद्धतीने चर्चा सुरू ठेवतील आणि पुढील प्रत्यक्ष बैठकीची तारीख लवकरच निश्चित केली जाईल अशी माहिती दिली आहे.

टॅरिफ मुळे चर्चेला महत्व

अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्के कर लावला आहे. त्यामुळे या व्यापार कराराला महत्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेने आधी भारतावर 25 टक्के कर लावला होता, तसेच काही दिवसांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याची शिक्षा म्हणून आणखी 25 टक्के कर लादण्यात आला आहे. भारताने या टॅरिफच्या निर्णयाला अन्यायकारक असे म्हटले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराबाबत ऑगस्टच्या अखेरीस होणारी सहावा फेरी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

आगामी काळात करार होण्याची आशा

दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराबाबत आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये दोन्ही देशांनी या कराराचा पहिला भाग या वर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दोन्ही देशांमधील संबंधांबाबत भाष्य केले होते. त्यामुळे आता आगामी काळात अंतिम करार होण्याची शक्यता आहे.

भारताने याआधी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. भारत राष्ट्रीय हित आणि बाजारपेठेच्या गरजांमुळे रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं म्हटलं आहे. त्याचबरोबर कोणत्याही व्यापार करारात शेतकरी, दुग्ध क्षेत्र आणि एमएसएमई यांच्या हितांशी तडजोड केली जाणार नाही, असंही भारताने अमेरिकेला सांगितलेलं आहे.