
गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले आहेत. रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर दुहेरी शुल्क लादले आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करणे सुमारे 40 टक्के कमी करणार असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल आयात कमी करण्याचे आश्वासन दिले असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आता भारत सरकारने ट्रम्प यांच्या या दाव्यावर उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, भारताकडून सांगण्यात आले आहे की ते या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून होणारी तेल आयात 40 टक्के कमी करणार आहे. अचानक तेल खरेदी थांबवता येणार आहे. यासाठी एक प्रक्रिया आहे. हळू हळू भारत तेल खरेदी कमी करून ती शुन्यावर आणणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा झाली आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्याला उत्तर देताना भारताने म्हटलं की, ‘आमच्या ऊर्जा धोरणाचे उद्दिष्ट देशातील ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे आहे. स्थिर किंमत नियमित आणि सुरक्षित पुरवठा याला देशाचा पाठिंबा आहे. आम्ही देशाच्या नागरिकांचे हित लक्षात घेऊन तेल खरेदी कोणत्या देशाकडून करायचे याचा निर्णय घेतला जातो.’ याचा अर्थ भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याचा दावा फेटाळला आहे.
अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे. यातील 25 टक्के कर हा रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे लादण्यात आला आहे. यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच अमेरिकेने भारताला अनेकदा रशियाकडून तेल खरेदी न करण्याचं आवाहन केले आहे. तसेच भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे कमी न केल्यास भारतावर आणखी शुल्क लावले जाण्याचाही इशारा अमेरिकेने दिला आहे. मात्र भारताने वारंवार रशियाकडून तेल खरेदी कमी करण्यास नकार दिलेला आहे. आताही भारताने अमेरिकेचा दावा फेटाळून लावला आहे.