‘सरकारने बुरखा आणि घुंघट दोन्हींवरही बंदी घालावी’

‘सरकारने बुरखा आणि घुंघट दोन्हींवरही बंदी घालावी’

भोपाळ : आपल्या स्पष्ट भूमिकांसाठी ओळखले जाणारे गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी बुरखा बंदीवरही आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारने बुरखा आणि राजस्थानमधील घुंघट या दोन्हींवर बंदी घालावी, अशी थेट मागणी जावेद अख्तर यांनी केली आहे.

अख्तर यांनी शहीद एटीएस प्रमुख हेमंत करकरेंबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि भाजपच्या भोपाळमधील लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “काही लोक चुका करुनही स्वतःला बरोबर सिद्ध करतात. प्रज्ञा ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी देऊन भाजपने त्यांचा पराभव स्वीकारला आहे.

‘साधूंच्या वेशात आलेल्यांवर विश्वास ठेऊ नका’

साधूंच्या वेशात आलेल्यांवर विश्वास ठेऊ नका. कारण रावणाने देखील साधूच्या वेशात येऊनच सीतेचं अपहरण केलं होतं, असे म्हणत जावेद यांनी प्रज्ञा ठाकूरवर घणाघाती टीका केली. तसेच प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देण्यामागे नक्कीच भाजपचा काहीतरी नाईलाज असेल, असाही टोला लगावला.

‘अनेक मोदी येतील आणि जातील, मात्र देश आहे आणि असाच राहील’

“जावेद अख्तर यांनी भाजपच्या कार्यकाळातील लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले. जर कुणी आमच्यासोबत नसेल, तर ते देशद्रोही आहेत”, अशीच भाजपची विचारसरणी असल्याचे अख्तर यांनी सांगितले. तसेच अनेक मोदी येतील आणि जातील, मात्र देश आहे आणि असाच राहील, असेही नमूद केले. यावेळी अख्तर यांनी ‘चौकीदार चोर है’ ही भाषा योग्य नसून त्याचे समर्थन करत नाही, असे स्पष्ट केले.

‘ही निवडणूक भारत कोणत्या दिशेने जाणार हे ठरवेल’

“ही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. देश यापुढे कोणत्या दिशेने जाणार हे हीच निवडणूक ठरवेल,” असे जावेद अख्तर यांनी लोकसभा निवडणुकीच्या महत्वावर बोलताना सांगितले.


Published On - 4:29 pm, Thu, 2 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI